- ऋजुता लुकतुके
भारताच्या क्रमवारीत आघाडीवर असलेल्या बुद्धिबळपटू अर्जुन एरिगसीने अमेरिकन व्हिसा मिळवण्यात येत असलेल्या अडचणींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. २६ डिसेंबरपासून न्यूयॉर्क सिटीमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ब्लिट्झ आणि रॅपिड स्पर्धेसाठी त्याला वेळेत अमेरिकेत पोहोचायचं आहे. पण, त्याला व्हिसा मिळत नाहीए. सध्या एरिगसीने अमेरिकन दूतावासाकडे मदतीचं जाहीर आवाहन केलं आहे.
‘मी गेल्याच आठवड्यात अमेरिकन व्हिसासाठी माझा पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे सादर केली आहेत. कृपया माझ्या अर्जाचा त्वरित विचार करून मला व्हिसा देण्यात यावा. कारण, लवकरच मला जागतिक रॅपिड व ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूयॉर्कला जायचं आहे,’ असं या पोस्टमध्ये अर्जुनने लिहलं आहे आणि अमेरिकन दूतावासाला त्याने टॅग केलं आहे. अर्जुन सध्या रॅपिड बुद्धिबळ प्रकारात भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. तसंच विश्वनाथन आनंद नंतर २८०० एलो रेटिंग गुण मिळवणारा तो फक्त दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे.
(हेही वाचा – Rupee vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? त्याचे काय फायदे, तोटे आहेत?)
. @USAndIndia Last week I submitted my passport to you for visa stamping and it still has not been returned. I request you to please expedite the process and return my passport as soon as possible as I need it for my travel to New York for World Rapid & Blitz Championship 🙏
If…
— Arjun Erigaisi (@ArjunErigaisi) December 20, 2024
जागतिक ब्लिट्झ व रॅपिड अजिंक्यपद स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. यातील ब्लिट्झ प्रकार हा बाद फेरीचा असेल. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन सह जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. भारताकडूनही अर्जुनसह प्रग्यानंदा, विदिथ गुजराती आणि नुकताच पारंपरिक जगज्जेता ठरलेला डी गुकेश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
तर जागतिक स्तरावर मॅग्नस कार्लसनसह फाबियानो कारुआना, हिकारू नाकामुरा आणि अलीरेझा फिरौझा हे खेळाडूही स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेची बक्षिसाची रक्कमही १.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी तगडी आहे. खुला गट तसंच महिला गट असा दोन प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. अलीकडे पारंपरिक बुद्धिबळाच्या तुलनेत रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकाराची लोकप्रियता तरुणांमध्ये वाढत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community