- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्ग असल्याचे आपण पाहत आलो. त्या मार्गावर दुकान आणि फेरीवाल्यांकडे जावून वारंवार खरेदी करत असलो तरी प्रत्यक्षात हे मार्ग आहेत हे महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनाच कल्पना नाही. दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या सर्व मार्गावरील दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश असले तरी प्रत्यक्षात केवळ न्यायमूर्ती रानडे मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई करून स्थानकासमोरील डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्गावरील फेरीवाल्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे रानडे मार्ग म्हणजेच दादर असून जावळे मार्ग आणि डिसिल्व्हा मार्ग दादरमध्ये नसल्याप्रमाणेच या दोन्ही मार्गावरील फेरीवाल्यांना संरक्षण दिले जात असल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (Dadar Hawker)
महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार यापूर्वी हाती घेतलेल्या २० ठिकाणांवरील फेरीवाल्यांवरील कारवाई पुढे कायम राखण्यासाठी मागील गुरुवारपासून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसरापासून १५० मीटर लांबीच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखाली सर्व गाळे आणि या मार्गाला जोडणारे न्यायमूर्ती रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्ग असून या तिन्ही रस्ते पुढे केळकर मार्गांला जोडले जातात. (Dadar Hawker)
(हेही वाचा – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी BJP उमेदवारांची छाननी सुरु)
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर पर्यंतच्या परिसरांतील फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित असून स्थानकाचे सर्व प्रवेशद्वार आणि याला जोडणाऱ्या तिन्ही मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाईत महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी हे दुजाभाव करताना दिसत आहे. रेल्वे स्थानकाच्या लगत फेरीवाले व्यवसाय करत असून त्याठिकाणी केवळ रानडे मार्गावरच कारवाई करून दादरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई केल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु जावळे मार्ग आणि डिसिल्व्ह मार्गावरील फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे रानडे मार्ग म्हणजे दादर का? जावळे मार्ग आणि डिसिल्व्हा मार्ग दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात येत नाही असा सवाल फेरीवाल्यांकडून तसेच पादचाऱ्यांकडून केला जात आहे. (Dadar Hawker)
मुळात रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करणे आवश्यक असताना महापालिकेचे अधिकारी व पोलिस हे रानडे मार्गावरील दीडशे मीटरच्या पुढील भागांमध्येही कारवाई करत आहेत, परंतु जावळे मार्ग आणि डिसिल्व्हा मार्गावर दीडशे मीटरच्या आतील भागांत बिनधास्तपणे व्यवसाय करता दिसत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना दादर परिसर नक्की कसा फेरीवाला मुक्त हवा हे स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर रानडे मार्गावर कारवाई होत असेल तर स्थानक परिसर, जावळे आणि डिसिल्व्हा मार्गावर कारवाई का नाही केली जात असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात असून जे अधिकारी या कारवाईला वेगळे वळण देत आहेत त्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला. पोलिसांची विशेष कुमक ही रानडे मार्गावरील बिट चौकी शेजारी असते आणि ते केवळ रानडे मार्ग फैरीवाला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, मग त्यांना जावळे मार्ग डिसिल्व्हा मार्ग दादरमध्ये येतात हे माहित नाही का असाही सवाल जनतेकडून विचारला जात आहे. त्यामुळे दादरमधील कारवाईत आता आयुक्तांना लक्ष घालणे आणि कारवाई तीव्र करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Dadar Hawker)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community