रुग्णसंख्या घटली… मुंबईत ऑक्सिजन खाटांच्या वापरात घट

एकूण १८ हजार ७४० खाटा या रिकाम्या आहेत.

161

मुंबईत सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या स्थितीत असून, मागील काही दिवसांपासून कोविडबाधित रुग्णांची संख्या पाचशे ते आठशेच्या घरात नियंत्रणात राहिलेली आहे. त्यामुळे ऑक्सिजन खाटांचा वापर करणाऱ्या रुग्णांचीही संख्या घटत चालली आहे. मुंबईत एकूण ९ हजार ८८ ऑक्सिजनप्रणाली आधारित खाटा असून, त्यावर सध्या १ हजार ३५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ७ हजार ७२९ ऑक्सिजन खाटा या रिकाम्या असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

१८ हजार ७४० खाटा रिकाम्या

मुंबईत सध्या दररोज ४५० ते ७०० पर्यंत कोविड रुग्ण आढळून येत आहेत. तर सुमारे सात हजारांपर्यंत सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. १४ जुलैपर्यंत मुंबईतील विविध कोविड रुग्णालये, जंबो कोविड सेंटर आदींमधील ऑक्सिजन बेड, आयीसीयू बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर खाटांसह एकूण २२ हजार २९२ खाटांपैकी ३ हजार ५५२ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण १८ हजार ७४० खाटा या रिकाम्या आहेत.

(हेही वाचाः मुंबईत अंथरुणाला खिळलेल्यांचे असे होणार लसीकरण)

अशी आहे खाटांची संख्या

आयसीयूच्या २ हजार ३३७ खाटांपैकी ९७९ खाटा वापरात आहेत, तर उर्वरित खाटा रिकाम्या आहेत. व्हेंटिलेटरच्या एकूण १ हजार २८२ खाटांपैकी ६२७ खाटा भरलेल्या आहेत. उर्वरित ६५५ खाटा या रिकाम्या आहेत. ऑक्सिजन खाटांपैकी ७ हजार ७२९ खाटा रिकाम्या असून मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालय आणि जंबो कोविड सेंटरमध्ये ५ हजार ३४० आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३ हजार ७४८ अशाप्रकारे एकूण ९ हजार ८८ ऑक्सिजन खाटा आहेत. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालय व कोविड सेंटरमधील ५५२ आणि खासगी रुग्णालयांमधील ८०७ खाटा भरलेल्या आहेत. तर या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ४ हजार ७८८ आणि २ हजार ९४१ खाटा रिकाम्या आहेत.

सर्वसाधारण खाटांपैकी १३ हजार ४५० खाटा रिकाम्या

मुंबईतील विविध जंबो कोविड सेंटर, रुग्णालय आणि लक्षणे नसलेल्या कोविड सेंटरमध्ये एकूण १५ हजार ७२४ खाटा असून, त्यातील १३ हजार ४५० खाटा रिकाम्या आहेत. तर २ हजार २७४ खाटा भरलेल्या आहेत.

(हेही वाचाः पुन्हा मुंबईची रुग्णसंख्या रोडावली!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.