क्लीन-अप मार्शलना कोटात उभे करणार

क्लीन-अप मार्शल तसेच संबंधित कंत्राटदाराचे नाव नमूद करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

170

मागील काही दिवसांमध्ये क्लीन-अप मार्शल गणवेशांमध्ये नसतानाही विनामास्कची कारवाई करताना आढळून आले आहेत. खासगी वाहने, रिक्षा आदींमध्ये हे क्लीन-अप मार्शल कारवाई करत विनामास्क फिरणा-या नागरिकांकडून दंड वसूल करत आहे. यामध्ये बोगस क्लीन-अप मार्शल असण्याची दाट शक्यता लक्षात घेता, आता सर्व मार्शलना कोटात उभे करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या क्लीन-अप मार्शलना महापालिकेच्यावतीने कोट दिला जावा आणि त्यावर ठळक अक्षरात क्लीन-अप मार्शल तसेच संबंधित कंत्राटदाराचे नाव नमूद करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

मुंबईतील काही क्लीन-अप मार्शलांकडून नागरिकांशी गैरवर्तणूक केली जात असल्याने, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याविषयीची गंभीरतेने दखल घेत घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीन-अप मार्शल यांची महापौर निवासस्थानी शनिवारी बैठक घेतली.

(हेही वाचाः मुंबईत अंथरुणाला खिळलेल्यांचे असे होणार लसीकरण)

महापौरांनी केल्या सूचना

या बैठकीत काही क्लीन-अप मार्शलची गैरवर्तणूक योग्य नसून, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. यामध्ये क्लीन-अप मार्शल परिधान करत असलेल्या गणवेशावरील कोटावर संबंधित क्लीन-अप मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे नाव, संबंधित क्लीन-अप मार्शलचे नाव, तसेच संबंधित कंत्राटदार यांची माहिती क्लीन-अप मार्शल परिधान करत असलेल्या कोटच्या समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, यापद्धतीने दर्शवणारी असली पाहिजे. जेणेकरुन ठळकपणे त्याची ओळख सर्वांना समजेल तसेच बोगस क्लीन-अप मार्शल काम करत असेल, तर त्याचा सुद्धा शोध घेणे सहज सुलभ होईल, अशाही सूचना महापौरांनी केल्या.

(हेही वाचाः रुग्णसंख्या घटली… मुंबईत ऑक्सिजन खाटांच्या वापरात घट)

या पद्धतीचा कोट तयार करुन पुढील आठवड्यात सादर करावा, जेणेकरुन यावर अंतिम निर्णय घेऊन हा कोट संपूर्ण मुंबईतील क्लीन-अप मार्शलला देता येईल, अशाही सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.