शनिवार, २१ डिसेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Environment Minister Bhupendra Yadav) यांच्या हस्ते ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल – २०२३’ (Forest Survey of India Report – 2023) चे प्रकाशन करण्यात आले. दर दोन वर्षांनी देशातील वनांची स्थिती सांगणारा हा अहवाल ‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येतो. या अहवालामधून पश्चिम घाटातील (Western Ghats) वनक्षेत्राबाबत गंभीर बाब समोर आली आहे. पश्चिम घाट हा १ लाख ४० हजार चौ.किमी भौगोलिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. त्याच्या विस्तार गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये आहे. २०१२ साली पश्चिम घाटाला ‘युनेस्को’चा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील मिळाला आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राची (डब्लूजीईएसए) निर्मिती करण्यात आली आहे. हे संवेदनशील क्षेत्र ६० हजार ८२५ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले असून त्यापैकी ५६ हजार ८२५ चौ.किमी क्षेत्र हे ३१ जुलै रोजीच्या प्रारूप अधिसूचनेनुसार अधिसूचित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Chhagan Bhujbal यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; अजित पवार म्हणतात, हा पक्षांतर्गत प्रश्न)
‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’ नुसार महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील (डब्लूजीईएसए) वनआच्छादनामध्ये १ हजार ८०५.७५ चौ.किमीने घट झाली आहे. २०१२ साली ‘डब्लूजीईएसएची’ पहिली प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी सकल पश्चिम घाटात ५९ हजार ९४० चौ.किमी क्षेत्र ‘डब्लूजीईएसए’ म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. २०१३ साली ‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील ‘डब्लूजीईएसए’मधील वन आच्छादन हे ९ हजार ८२५.०३ चौ.किमी होते. त्यानंतर आता दहा वर्षानंतर केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे क्षेत्र ८ हजार ०१९.२८ चौ.किमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘डब्लूजीईएसए’चे क्षेत्र अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात विस्तारले आहे. त्यामधील कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड आणि सातारी जिल्ह्यातील वनाआच्छादनामध्ये प्रचंड घट झाली आहे. २०१२ सालच्या तुलनेत २०२४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रारूप अधिसूचनेत पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या क्षेत्रफळामध्ये घट केल्याने देखील वन आच्छादन घट झाल्याचे दिसते.
हेही पाहा –