मुंबईत शनिवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला. पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. शनिवारी रात्रभरात मुंबईत 192.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. आता पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढील 24 तासांत देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अशी आहे पावसाची नोंद
शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्री सुद्धा पावसाचा जोर कायम राहिला. मुंबई शहर, पश्चिम तसेच पूर्व उपनगरात दमदार पाऊस कोसळला. पूर्व उपनगराला पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. शहर 176.96 मिमी, पश्चिम उपनगर 195.48 मिमी तर पूर्व उपनगर 204.07 मिमी पावसाची नोंद झाली.
(हेही वाचाः मुंबईतील चेंबूर, विक्रोळी परिसरात मोठ्या दुर्घटना! घरे कोसळून अनेकांचा मृत्यू)
आजही मुसळधार
सांताक्रूझ 234.9 मिमी., कुलाबा 196.8 मिमी., राम मंदिर 260.7 मिमी., महालक्ष्मी 205.5 मिमी., जुहू विमानतळ 193.5 मिमी., मीरा रोड 236.5 मिमी., तर भाईंदर परिसरात 213.5 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आज देखील मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा प्रदेशिक हवामान विभागाने दिला आहे.ॉ
मुंबईत पाणी तुंबण्याची भीती
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तुळशी पाठोपाठ विहार तलावही रविवारी सकाळी भरुन वाहू लागले. विहार तलाव भरल्याने आता मुंबईला अधिक धोका निर्माण झाला आहे. या तलावातील पाणी मिठी नदीला येऊन मिळत असल्याने आता उपनगरातील वांद्रे, कुर्ला आदी भागात मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढून आसपासच्या परिसरात पाणी साचण्याची अधिक भीती व्यक्त केली जात आहे.