BMC : बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, मार्गदर्शक तत्वे जारी

526
BMC : महापालिकेच्या भूखंड लिलावाकडे पाठ, प्रशासनाने अखेर गुंडाळला प्रस्ताव
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण (Air pollution) नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड व तत्सम बाबी इंधन म्हणून जाळणे तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरुन वायू प्रदूषण होणार नाही. रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, जी प्रामुख्याने प्रदूषणास कारणीभूत ठरते, ती नियंत्रित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाने तात्काळ आणि कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व सहाय्यक अभियंते आणि सहायक मुख्य पर्यवेक्षक यांनी या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे तसेच त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Mahayuti च्या मंत्र्यांना दालनांचे, बंगल्यांचे वाटप; कुणाला कुठे दालन आणि बंगला?)

महापालिकेने कसा आखला कृती आराखडा
  • प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी संयंत्रांचा प्रभावीपणे वापर करावा.
  • वर्दळीच्या रस्त्यांवर नियमितपणे पाण्याची फवारणी करावी.
  • रस्त्यांचे व रस्त्यालगत सुरु असलेल्या बांधकामाचे नियमितपणे परीक्षण करावे.
  • उपद्रव शोध पथक, क्लीनअप मार्शल यांच्यामार्फत संबंधितांना सक्त सूचना देण्यात याव्यात. रस्त्यावरील धूळ, राडारोडा व कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
  • खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी करावी.
  • ‘डेब्रिस ऑन कॉल’ सेवेचे सक्षमीकरण व प्रभावीपणे वापर करण्यासाठी राडारोडा संकलन आणि त्याची विल्हेवाट प्रभावीपणे व वेळेत करावी.
  • बांधकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी.
  • बांधकाम साहित्याचे वहन करणाऱ्या वाहनांकडे वैध परवाना जमा असल्याची खातरजमा करावी.
  • विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या, तसेच वाहनावर आच्छादन न टाकता सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी.
  • उपद्रव शोध पथक आणि क्लीनअप मार्शल्स यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका (BMC) हद्दीत कचरा जाळण्यास प्रतिबंध करावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.