- प्रतिनिधी
बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आता वर्षभरापेक्षा कमी अवधी उरला आहे. अशात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आगामी निवडणुकीत चेहरा बनवण्याविषयी एनडीएमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे सूचित होत आहे. त्या राज्यात महाराष्ट्र मॉडेल राबवले जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बिहारमधील मागील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झाली. ते वेळापत्रक विचारात घेता आता आगामी निवडणुकीसाठी १० महिनेच उरले आहेत. त्यामुळे बिहार इलेक्शन मोडमध्ये जाऊ लागला आहे. त्या राज्यात भाजप, जेडीयू आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएचे सरकार आहे. (Bihar Assembly Election)
(हेही वाचा – Boxing Day Test : भारतीय गोलंदाज मेलबर्नमध्ये बुमराहकडून प्रेरणा घेतील का?)
भाजपाकडे जास्त जागा असूनही…
मागील निवडणुकीत भाजपने नितीश यांच्या जेडीयूपेक्षाही अधिक जागा जिंकल्या. तसे असूनही भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला नाही. त्या पदावर पुन्हा नितीश विराजमान झाले. तसेच काहीसे महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी घडले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री बनवले. महाराष्ट्रात नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक महायुतीने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मात्र, निवडणुकीत चेहरा म्हणून कुणाचे नाव थेटपणे जाहीर करण्याचे टाळले. त्या निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळवले. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. (Bihar Assembly Election)
(हेही वाचा – EPFO Deadline : यूएएन सक्रियता, बँक-आधार जोडणी यासाठीची मुदत वाढवली)
महाराष्ट्राचे ते मॉडेल बिहारमध्ये
आता महाराष्ट्राचे ते मॉडेल बिहारमध्ये वापरण्याची रणनीती भाजपाकडून आखली जाऊ शकते, अशा चर्चांना तोंड फुटले आहे. त्या चर्चांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकत्याच मांडलेल्या भूमिकेने आणखीच बळ मिळाले. महाराष्ट्राप्रमाणेच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करून NDA निवडणुकीला सामोरी जाणार का, असा प्रश्न त्यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी विचारण्यात आला. एनडीएचे घटकपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. तो निर्णय झाल्यावर तुम्हाला सांगू, असे उत्तर शाह यांनी दिले. ते उत्तर राजकीय सस्पेन्स वाढवणारे ठरले आहे. त्यातून ७३ वर्षीय नितीश यांचा चेहरा पुढे न करण्याचा आग्रह भाजप धरू शकतो, असा अर्थ काढला जाऊ लागला आहे. अर्थात, चर्चांना तोंड फुटल्यानंतर एनडीएमधील सर्वच घटकपक्षांकडून सारवासारव सुरू झाली आहे. एनडीए आगामी निवडणूक नितीश यांच्याच नेतृत्वाखाली लढवेल, असा सूर ते पक्ष आळवत आहेत. मात्र, खरी मेख तिथेच असल्याकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक महायुतीने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर सर्व घटकपक्ष एकत्रितपणे घेतील, असे भाजपाकडून सांगितले गेल्याकडे ते दिशा निर्देश करत आहेत. (Bihar Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community