राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत, असे विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद चांगलाच तापला आहे. त्यातच आता शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हतारे असं समीकरण जोडून लोकांची दिशाभूल केली जाते. मी म्हातारा जरी असलो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे, यांच्यासारखा मी नटसम्राटासारखं नाही, असे म्हणत आढळरावांनी कोल्हेंना टोला लगावला आहे.
स्क्रिप्ट दिले तेवढेच वाचावे
महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डाववले गेलेच, पण मलाही साधा फोन केला नाही आणि ज्यांनी मोठे केले त्यांनाचा लक्ष्य केले. कोल्हेंनी जेवढे स्क्रिप्ट दिले तेवढे वाचावे, अशा शब्दांत माजी खासदार आणि सेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंना सणसणीत टोला लगावला. कोल्हेंनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवर बोलायचे, हा या माणसातील गुणधर्म आहे का? असा थेट सवाल आढळराव पाटील यांनी कोल्हेंना विचारला.
(हेही वाचाः विधानसभा अध्यक्ष निवडीवर काय म्हणाल्या नीलम ताई?)
उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नका
मी खासदार असताना लोकसभेत भांडून 2018ला माझ्या पाठपुराव्यामुळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला. मार्च 2019ला भूमिपूजन केलं. माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे. आता मी खासदार नाही ठीक आहे. पण मला उद्घाटनाला किमान फोन तरी करायला हवा होता. मुख्यमंत्र्यांचा फोटो तरी जाहिरातीत वापरायला पाहिजे होता. पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे, दिलीप मोहिते करतात, असा आरोपही त्यांनी केला. शनिवारी कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले. कोल्ह्यानी उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये, कोल्हेंना अडीच लाख पगार आहे. शिवाय हा माणूस म्हणतोय, शूटिंग केल्याशिवाय माझी चूल पेटत नाही. तर मग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शूटिंगसाठी निवडून दिलंय का?, असा सवाल करत आढळराव यांनी कोल्हेंवर शाब्दिक तोफ डागली.
(हेही वाचाः भाजपला सापडला नवा भिडू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार?)
काय म्हणाले होते कोल्हे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते, म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचे होते. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरते असणे गरजेचे आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय, तीच आपण शिरुर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं, याचं मला आश्चर्य वाटते, असे खासदार अमोल कोल्हे शिरुरमध्ये बोलले होते. त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता.
(हेही वाचाः आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशाने मनविसेचे ग्रहण सुटले)
Join Our WhatsApp Community