21 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Military School), मुरबाड येथे मराठी विज्ञान परिषद, ठाणे, रोटरी क्लब, ठाणे आणि इनरव्हिल संस्था, ठाणे यांच्यावतीने एक दिवसीय विज्ञान जागृती उपक्रम व आकाश दर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी इनरव्हिल, ठाणे संस्थेच्या अध्यक्ष डॉ. छाया भडकमकर, रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या प्रेसिडेंट अपर्णा कुंटे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह, प्राध्यापक ना.द. मांडगे, रोटरी क्लब ऑफ ठाणेचे अध्यक्ष कंबल टिकू, महेंद्र केळकर, नि.बा. रानडे, श्रीनिवास घैसास, मेधा सोमण, साधना वझे, कुंदा कारभारी, निलिमा ठाकूर, संगिता जाधव, पद्मजा घैसास, अनुषा टिकू, सुखी कोपरकर, अंजली कोपरकर, महूना हटाळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शाळेचे प्राचार्य काशीनाथ भोईर यांनी सर्व उपस्थितांचा शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. “विज्ञाना जागृती उपक्रम आणि आकाश दर्शन” या एक दिवसीय शिबीराची सुरुवात शानदार कार्यक्रमाने झाली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी प्रस्ताविक सादर केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी शाळेच्या स्थापनेच्या ध्येय, उद्दिष्टांसह शाळेच्या, शैक्षणिक, क्रिडा व इतर उपक्रमांविषयी माहिती दिली. यानंतर, प्रा. नामदेव मांडगे यांनी मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि रोटरी क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित केलेल्या, “विज्ञान जागृती उपक्रम व आकाश दर्शन” या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. ‘मोबाईलचा अति वापर आणि दुष्परिणाम” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना तज्ञ मार्गदर्शक हर्षद मेंगळे यांनी मोबाईलच्या सततच्या वापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम उदाहरणांसह स्पष्ट केले. (Military School)
तर वयात येणाऱ्या मुला – मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल माहिती दिली. मुलीच्या शारीरीक बदलांबदद्ल व त्याला सामोरे जातांना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. “गुड टच, बॅड टच” या विषयावर अंजली मॅडम यांनी मुलांना समुदेशन पर मार्गदर्शन केले. “गणितातील गमती जमती ‘ या विषयावर प्रा. प्रधान कुलकर्णी यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन, गणितातील गमती जमती स्पष्ट केल्या.
दुपार नंतरच्या सत्रात “पी.सी.ओ.डी व स्त्रियांचे आजार” या विषयावर आणि घ्यावयाची काळजी या बाबत डॉ. छाया भडकमकर व पुष्पलता डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. पुढिल सत्रात “रोबोटीक्स ” या विषयावर मानवी जीवनात होत असलेल्या बदलांबदद्ल माहिती दिली. यांत्रिकीकरणामुळे होणारे बदल आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तर “व्यवसाय विषयक मार्गदर्शन आणि विज्ञान युगातील व्यवसायामधील विविध संधी” याबाबत जितेंद्र भांबुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी “आकाश दर्शन ” या विषयावर खगोल अभ्यासक, गणित तज्ञ, पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना आपल्या विशेष शैलीत आकाश दर्शन घडवले. सूर्य, चंद्र, ग्रह तारे, सूर्य ग्रहण चंद्र ग्रहण, धूमकेतू इ. बाबतीत मजेशीर माहिती सांगितली. तसेच, आजपासून सूर्याचा, उत्तरायणारंभ व शिषिर ऋतची सुरुवात होणार असल्या बाबतची माहीती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंचांगकर्ते दा.कृ. सोमन म्हणाले की, विद्यार्थी खूप हुशार असून विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न अभ्यास करायला लावणारे आहेत. विद्यार्थ्यांमधील स्वयंशिस्तीचे आणि संशोधक वृत्तीचे त्यांनी कौतुक केले.
खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद उत्तम होता. रात्री ८.३० वाजता अद्ययावत टेलिस्कोपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना शुक्र, गुरू, बुध, शनी इ. ग्रह दाखविण्यात आले. “आकाश दर्शना” नंतर सर्वाचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेतली. राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.(Military School)