राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घाला; आदित्य ठाकरे यांनी CM Devendra Fadnavis यांना लिहिले पत्र

69
राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घाला; आदित्य ठाकरे यांनी CM Devendra Fadnavis यांना लिहिले पत्र
राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घाला; आदित्य ठाकरे यांनी CM Devendra Fadnavis यांना लिहिले पत्र

अनधिकृत बॅनरमुळे (illegal hoardings) केवळ मुंबईच नाही, तर सर्वच शहरे विकृत झाली आहेत. निवडणुका असो किंवा नसो राजकीय नेत्यांचे बॅनर्स गावागावात, चौकाचौकात आणि गल्लोगल्ली झळकल्याचे पाहायला मिळतात. दिवाळी, दसरा असो, नवरात्री असो, दहीहंडी असो किंवा नवीन वर्षाचं स्वागत, वाढदिवस असो. नेत्यांचे फोटो झळकवण्याची जणू राजकीय पक्षाच्या समर्थकांमध्ये स्पर्धाच चाललेली असते.

आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 2025 साठी नवा संकल्प केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे मागणीही केली आहे. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध लावण्यात यावा, राज्यभरात हा निर्णय लागू करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

(हेही वाचा – Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?)

आपण 2025 मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत.

आपण या बालिश राजकीय स्पर्धेला बाजूला ठेवून, सर्व राजकीय पक्षांनी बेकायदेशीर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतला, तर नागरिकांना आपण मोठा दिलासा देऊ शकतो. ह्यामुळे आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. त्यामुळे, मी आपल्याला विनंती करतो की, आपण ह्या दिशेने पहिले पाऊल टाका, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही आदित्य यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून पत्रात म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.