पावसाचे धुमशान! मध्य रेल्वे विस्कळीत! सखल भागात साचले पाणी! कोकण रेल्वे ठप्प!

गोवा-कोकण रेल्वे मार्गावर थिविम ते करमळी रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे.

120

मुंबईत सोमवारी, १९ जुलै रोजीही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे सकाळपासूनच विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग, अंधेरी, दादर, परळ या ठिकाणी सखल भागात पुन्हा पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.

उपनगरीय रेल्वे वेळापत्रक कोलमडले! 

विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पाणी साचले. त्यामुळे २० मिनिटे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र २०-२५ मिनिटे लोकल उशिराने धावत आहे. अशा प्रकारे उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.

(हेही वाचा : महामुंबईला पावसाचा धोका कायम! पुन्हा जमले काळे ढग!)

रस्त्यांना नद्यांचे स्वरूप!

नवी मुंबईतील महापे पुलाखाली पाणी साचल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. टिटवाळा-कल्याण रस्त्यावरील बल्याणी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरु असून डोंबिवलीच्या नेहरू रोडवर पाणी साचले असून दुकानामध्ये पाणी शिरले आहे. विक्रोळी पार्क साईट येथेही रस्ता पाण्याखाली गेला आहे. वसईत मुसळधार पाऊस सुरूच आहे. तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. वसईतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे १२ गावांचा संपर्क तुटला, तर नवी मुंबईत खारघर डोंगरवर अडकलेल्या ११६ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेल्या २०० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे.

कोकण रेल्वे ठप्प!

गोवा-कोकण रेल्वे मार्गावर थिविम ते करमळी रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. कोकण रेल्वे स्थानकावर अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे. पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेला आहे. वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने ( नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे. माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबाच्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे. सध्या दरड हटविण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने (मांजरवणे) वाहतूक सुरू आहे.

रायगडात नद्यांना पूर!

मुसळधार पावसाने कोकणसह रायगडला झोडपून काढले आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. ओढे, नद्या-नाल्यांनी पात्रे सोडली आहेत. बाळगंगा नदी, पटलगांगा नदी, भोगावती नदी, दादरखाडी ओवरफ्लो झाल्या आहेत. या नदींचे पाणी घराघरात घुसले आहे. पेण तालुक्यातील रावे आणि साई गाव इथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून इथे दोन तासांपासून वीजपुरवठा बंद आहे. पनवेल, पेण या भागाला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे.

गणपती मूर्ती पाण्याखाली!

ganapati

पेण तालुक्यातील बऱ्याच गावांना फटका बसला आहे. जोहे-तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेला आहे. जोहे-कळवे परिसरातील सर्व भात शेती पाण्याखाली गेली आहे. जोहे विभागातील गणपती कारखान्यांत पाणी घुसले आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गणपतींच्या मुर्त्या सुद्धा भिजल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.