-
सचिन धानजी,मुंबई
दहिसर येथील जकात नाक्याच्या जागेवर महापालिकेच्यावतीने वाहतूक आणि व्यावासिक केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्याअंतर्गत याठिकाणी महापालिकेच्यावतीने तारांकित हॉटेल उभारले जाणार आहे. १३१ खोल्यांचे हे तारांकित हॉटेल असेल. याशिवाय व्यावसायिक गाळे उभारुन या हॉटेलसह व्यावसायिक गाळे तथा कार्यालये भाड्याने देऊन त्यातून महापालिकेचावतीने महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा- Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट)
महापालिकेच्यावतीने आकारला जाणारा जकात कर रद्द करण्यात आल्यानंतर सर्व जकात नाके बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या जकात नाक्यांच्या जागांचा वापर करण्याच्यादृष्टीकोनातून वाहतूक आणि व्यावसायिक केंद्रांचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दहिसर येथील जकात नाक्यांच्या जागेवर या वाहतूक आणि व्यावसायिक केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे. दहिसर येथील या जागेचे क्षेत्रफळ सुमारे १८६०० चौरस मीटर एवढे असून नव्या विकास आराखड्यानुसार यावर ट्रक टर्मिनसचे आरक्षण आहे. या जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक व व्यावसायिक केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने यापूर्वी सोविल लिमिटेड आणि आरकॉम या संयुक्त भागीदार वास्तूविशारद कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. (BMC)
सल्लागाराने बनवलेल्या आराखड्यानुसार १९ मजली इमारतीचा आणि तारांकित हॉटेल इमारतीचा समावेश आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इमारत क्रमांक १ व २मध्ये एकूण ४५६ बस पार्किंग, १४२४ मोटर वाहन पार्किंग आदींचा समावेश आहे. तर एकूण १३१ खोल्यांचे तारांकित हॉटेल असेल. हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा- Pak vs SA, Centurion Test : आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशचा कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम)
बस टर्मिनल व वाहनतळ क्षेत्र, प्लाझा क्षेत्र, व्यावसायिक कार्यालय क्षेत्र, हॉटेल क्षेत्र, किरकोळ व्यावसायिक क्षेत्र आदींचा समावेश असून यासर्व प्रकल्प कामांसाठी विविध करांसह दोन हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी न्याती इंजिनिअर आणि कन्सल्टंटस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस टर्मिनस तसेच ट्रक टर्मिनस म्हणून या जागेचा वापर होईल आणि तारांकित हॉटेल आणि व्यावसायिक गाळे तथा कार्यालयांचा वितरण करून भाडेतत्वावर दिल्या जाणार आहे. यातून महापालिकेला महसूल प्राप्त होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community