- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ मेलबर्न कसोटीत अडचणीत आहे. संघाचं पहिलं लक्ष्य असणार आहे ते फॉलो ऑन वाचवण्याचं आणि त्यासाठी संघाला अजून ११० धावा हव्या आहेत. रोहित, विराट, जयस्वालसह पहिले ५ फलंदाज आधीच बाद झाले आहेत. रिषभ पंत, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन फलंदाज अजून बाकी आहेत. आव्हान खडतर असलं तरी वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या दिवसाच्या शेवटी संघाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ‘आम्ही सकारात्मक आहोत,’ असं म्हणत असतानाच त्याच्यावर असलेल्या जबाबदारीचं भानही त्याला आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा – Police Officers Transfer : घरवापसीनंतरही मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडाखाली)
‘माझ्याकडून संघाला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही प्रकारात अपेक्षा आहेत, ही गोष्ट मला सुखावणारी आहे. मला अशावेळी चांगली कामगिरी करून दाखवायला आवडेल,’ असं सुंदर दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या ४७४ धावसंख्येला उत्तर देताना रोहित झटपट बाद झाल्यावर आधी जयस्वाल आणि राहुल, त्यानंतर विराट आणि जयस्वाल यांनी भागिदारी जमवली. तिसऱ्या गड्यासाठी तर १०२ धावांची भागिदारी झालेली असताना अचानक जयस्वाल ८२ धावांवर धावचित झाला. मागोमाग विराट कोहली उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याच्या जुन्या सवयीला बळी पडला आणि ३६ धावांवर बाद झाला. (Boxing Day Test)
(हेही वाचा – Air Pollution : मुंबईतील रस्ते ब्रशिंग आणि धुण्यासाठी १०० टँकरसह फौजफाटा सज्ज)
३ बाद १५३ वरून भारतीय भारतीय अवस्था ५ बाद १५९ अशी झाली. शेवटच्या अर्ध्या तासात जयस्वाल, कोहली आणि आकाशदीप बाद झाले. अशावेळी संघ सध्या कोंडीत सापडला आहे. पण, परिस्थिती तितकीशी गंभीर असल्याचं वॉशिंग्टनला वाटत नाही. ‘आम्ही दिवसात एका सत्रात चांगला खेळ केला. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं जाऊ असं तेव्हा वाटलं होतं. पण, झटपट गडी गमावल्यामुळे परिस्थिती थोडी अवघड झाली आहे. पण, भारतीय ड्रेसिंग रुममध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि शनिवारी आम्ही सकारात्मक मानसिकतेतून मैदानात उतरणार आहोत. कसोटीचे ३ दिवस बाकी आहेत बरीच षटकं व्हायची आहेत. आम्ही पुनरागमन करू,’ असं सुंदरने बोलून दाखवलं. सध्या भारतीय संघ ५ बाद १६४ धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा ४ तर रिषभ पंत ६ धावांवर खेळत आहेत. फॉलो ऑन टाळण्यासाठी दोघांना मैदानावर दीर्घ काळ उभं रहावं लागेल. (Boxing Day Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community