Rohit Sharma : रोहित शर्माने सिडनी कसोटीपूर्वीच निवृत्त व्हावं का?

रोहित शर्माचा खराब फॉर्म कुठल्याही क्रमाकांवर सुरूच आहे.

93
Rohit Sharma : रोहित शर्माने सिडनी कसोटीपूर्वीच निवृत्त व्हावं का?
Rohit Sharma : रोहित शर्माने सिडनी कसोटीपूर्वीच निवृत्त व्हावं का?
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा (Rohit Sharma) सिडनी कसोटीनंतर निवृत्ती स्वीकारणार हे जवळ जवळ निश्चित आहे. एकवेळ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीपर्यंत तो मुदतवाढ मागून घेऊ शकतो. पण, बीसीसीआयकडून त्याला मुदतवाढ मिळेल अशी शक्यता कमीच आहे. दुसरं म्हणजे, भारतीय संघ अंतिम फेरी गाठण्याची शक्यताच आता कमी आहे. एक बोलकी आकडेवारी सध्या सोशल मीडियावर फिरते आहे. आणि त्यानुसार, रोहित शर्माने (Rohit Sharma) बोर्डर – गावसकर मालिकेत आतापर्यंत ५ डावांमध्ये ३१ धावा केल्या आहेत. आणि मालिकेत जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) बळी आहेत ३०. ही तुलना हास्यास्पद आहे. आणि लोकांमध्ये हशा पिकवण्यासाठीच ती समोर मांडली आहे, हे खरं आहे. पण, त्यातून रोहितसाठी एक भयाण वास्तव दिसतंय. ३७ वर्षांचा रोहित काही झालं तरी फॉर्ममध्ये येत नाहीए. सतत त्याच चुका करतोय. आणि दुहेरी आकडाही त्याला गाठता येत नाहीए.

सहावा क्रमांक असो की, सलामी या मालिकेत ३ कसोटीतील ५ डावांमध्ये त्याने ६ च्या सरासरीने ३१ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणूनही त्याच्याकडून तांत्रिक चुका झाल्या आहेत. ब्रिस्बेन कसोटीत पावसामुळे भारतीय संघ वाचला. आणि मेलबर्नमध्ये पूर्ण ५ दिवसांचा खेळ झाला तिथे भारतीय संघातील कर्णधारच्या निर्णय क्षमतेतील चुका सगळ्यांसमोर आल्या. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर ऑस्ट्रेलियातच आहेत. त्यांनी बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रोहितच्या निवृत्तीवर चर्चा केल्याचंही आता समजतंय.

(हेही वाचा – Rishabh Pant तो फटका खेळला ती संघाची रणनीती की, ऋषभची एकट्याची चूक?)

निवृत्ती दरवाजा ठोठावतेय हे स्पष्ट आहे. तिची योग्य वेळ कोणती, हा नवीन प्रश्न आहे. रवीचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यातच आपली निवृत्ती अचानक जाहीर केली. आता मालिकेत एकमेव कसोटी बाकी असताना ही कसोटी रोहितला खेळायला मिळावी, की आधीच त्याने निवृत्ती स्वीकारावी, हा प्रश्न आहे. याला कारण म्हणजे, रोहितला सलामीला खेळवण्याच्या नादात भारताने शुभमन गिल या युवा फलंदाजाला संघाबाहेर बसवलं. मधल्या फळीत दोन फिरकीपटू खेळवायचे होते. त्यामुळे सुंदर संघात आला. आणि शुभमन, ज्याने ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये चांगली सुरुवात केली होती, त्याला बाहेर बसावं लागलं.

निवृत्तीची घोषणा नेमकी कधी होणार, हे अजून स्पष्ट नसलं तरी बोर्डर – गावसकर मालिकेनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी खेळू शकेल याची शक्यता आता खूपच कमी आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी खेळता यावी (भारतीय संघ पात्र ठरल्यास) असं रोहितला नक्कीच वाटत असणार. पण, भारतीय संघ ती मजल मारू शकला नाही तर नक्कीच सिडनी कसोटी रोहितची शेवटची कसोटी असणार आहे.

(हेही वाचा – Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त)

२०२४ मध्ये रोहित १४ कसोटी खेळला आहे. आणि त्यात २ शतकं आणि २ अर्धशतकांसह विराटने जेमतेम २३ धावांची सरासरी राखली आहे. १४ कसोटींमध्ये रोहितने ६१९ धावा केल्या आहेत. आणि मैदानावर त्याची चमक दिसत नाहीए. रोहितसाठी तंदुरुस्ती हा एक मुद्दा आहेच. विराट कोहली (Virat Kohli) इतका तंदुरुस्त रोहित कधीच नव्हता. पण, आता तो स्तरही अधिक ढासळत चालला आहे. शिवाय खराब कामगिरीचा परिणाम त्याच्या मैदानातील वावरावरही होत आहे. या मालिकेत काही महत्त्वाचे निर्णय घेताना रोहितकडून चुका झाल्या आहेत.

ब्रिस्बेनमध्ये त्याने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी घेतली. समोरच्या फलंदाजांचा थरकाप उडवले असा एकमेव बुमराह (Jasprit Bumrah) संघात असताना रोहितने ही जोखीम पत्करली. आणि त्यानंतर सिराज, हर्षित पुरेसे फॉर्ममध्ये नसताना, बुमराहला विश्रांती कशी द्यायची, याचं उत्तर रोहितला ४ कसोटी झाल्या तरी मिळालेलं नाही. प्रतिस्पर्धी कमिन्सने मेलबर्नमध्ये ७ गोलंदाज खुबीने वापरले. आणि रोहितने वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांना संघात घेऊनही गोलंदाजी दिली ती थेट ५० व्या षटकांत. त्याची हतबलता इतकी की, मेलबर्नमध्ये पहिल्या डावांत त्याने बुमराहला ९ वेगवेगळ्या स्पेलमध्ये वापरलं.

भारतासाठी रोहितच्या निवृत्तीबरोबरच महत्त्वाचा प्रश्न आहे तो संघाच्या स्थित्यंतराचा. कारण, रोहित जाऊन नवीन कर्णधाराला स्थिरावायला वेळ मिळायला हवाय. २०१४ मध्ये हाच विचार करून धोणीने मालिकेच्या मध्यातच नेतृत्वाची धुरा विराटकडे सोपवली होती. आता प्रश्न आहे रोहित तसं करेल का?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.