Shatabdi Hospital : गोवंडी शताब्दी रुग्णालयात ईसीजी काढतो सफाई कामगार; माजी नगरसेविकेने आणला प्रकार उघडकीस

892
Shatabdi Hospital : गोवंडी शताब्दी रुग्णालयात ईसीजी काढतो सफाई कामगार; माजी नगरसेविकेने आणला प्रकार उघडकीस
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय अर्थात गोवंडी शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) रुग्णांची ईसीजी हे तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांऐवजी रुग्णालयातील सफाई कामगारच काढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे ही बाब उघडकीस आणली आहे. या रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञ नसल्याने सफाई कामगार ईसीजी काढत असल्याच्या तक्रारी महिलांकडून आल्यानंतर रुक्साना सिद्दीकी यांनी बुरखा घालून महिला रुग्णासोबत जात हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य व्यवस्थेचेच तीन तेरा वाजले असून महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

मुंबई महापालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी परिसरातील गरीब जनता उपचाराकरता जात असून गरीब रुग्णांना सेवा देणाऱ्या या रुग्णालयात महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की विभागातील महिलांच्या वांरवार माझ्याकडे याबाबत तक्रारी येत होत्या. त्यानुसार काळा बुरखा घालून महिला रुग्णासोबत गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर माझ्यासोबतची महिला ईसीजी काढण्यास गेली असता तिथे पुरुष कर्मचारी खाकी गणवेशात दिसला. त्यामुळे जेव्हा मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विचारले की तुझी पोस्ट काय आहे, तर त्याने आपली ओळख सफाई कामगार असल्याची करून दिली.

New Project 2024 12 31T203351.585

(हेही वाचा – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार; पदभार स्विकारताच मंत्री Shivendra Raje Bhosale यांची ग्वाही)

ईसीजी काढण्यासाठी तंत्रज्ञ कर्मचाऱ्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्याची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. परंतु, हा सफाई कामगार असल्याचे दिसून आल्याने त्याची चौकशी केल्यानंतर आपल्याला यापूर्वीच्या डॉक्टरांनी सर्व शिकवले आहे. त्यानुसार मी रुग्णांची ईसीजी करतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याला सोबत घेऊन रुग्णालयाचे अधिक्षक सुनील पाकळे यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर सध्या यासाठी माणूस मिळत नाही म्हणून त्याच्यावर ही जबाबदारी टाकली असल्याचे त्यांनी मला सांगितले, असे सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. पाकळे यांच्या म्हणण्यानुसार त्याला सर्व शिकले असून तांत्रिक पद आहे आणि कंत्राटी तंत्रज्ञ पण मिळत नाही म्हणून त्याला शिकवले आहे. परंतु महिलांची ईसीजी करता नर्स सोबत असणे आवश्यक असते, पण नर्सही नसते, आणि माझ्या पाहणीत हे दिसून आले. पण अधिक्षक मला म्हणाले की नर्स या महिलांचे ईसीजी करताना उपस्थित राहणे गरजेचे आहे, पण रुग्णासोबत गेली तेव्हा त्याठिकाणी नर्स नव्हती, असे सिद्दीकी यांनी सांगितले. (Shatabdi Hospital)

त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून महापालिकेच्या या रुग्णालयात गरीब महिला व पुरुष रुग्ण येत असून जर महिलांचा ईसीजी पुरुष काढतो हेच मुळी योग्य नाही. त्यातच तो तंज्ञत्र नसून सफाई कामगार आहे. हा प्रकार तर अत्यंत किळस आणणारा आणि महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढणारा आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून संबंधित सफाई कामगार आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक यांना तातडीने निलंबित केले पाहिजे अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त परिमंडळ ६ आणि गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Shatabdi Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.