मुंबईत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता या सोनसाखळी चोरांचा फटका मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांना देखील बसला आहे. शिवाजी पार्क येथे बाकड्यावर बसलेल्या सविता मालपेकर यांना वेळ विचारण्यासाठी आलेल्या सोनसाखळी चोराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून, मोटर सायकलवरुन पळ काढला. सोनसाखळी खेचताना सविता मालपेकर यांचा कुर्ता फाटला आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, या सोनसाखळी चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
काय झाले नेमके?
सविता मालपेकर या मराठी सिने-नाट्यसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत. दादर शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या सविता मालपेकर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क येथील राजा बडे चौक या ठिकाणी गेल्या होत्या. फेरफटका मारल्यानंतर दम लागल्यामुळे त्या केळुसकर रोड, पार्क मैदान गेट नंबर ५ जवळील बाकड्यावर येऊन बसलेल्या होत्या. त्यावेळी एक इसम त्यांच्याकडे आला आणि त्याने सविता मालपेकर यांना वेळ विचारली. मात्र मालपेकर यांनी वेळ न सांगता त्या बसून होत्या. काही वेळाने तीच व्यक्ती मालपेकर यांच्याकडे आली आणि काही कळण्याच्या आत त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील बालाजीचे लॉकेट असलेली, सोन्याची 30 ग्राम वजनाची सोनसाखळी खेचली. त्यानंतर कठड्यावरून उडी घेऊन तो मोटार सायकलवरुन ट्रॉफिमा हॉटेलच्या दिशेने पळून गेला. सविता मालपेकर यांनी आरडाओरडा केल्यामुळे त्या ठिकाणी इतर नागरिकांनी धाव घेऊन पोलिसांना कळवले.
(हेही वाचाः ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?)
१ लाख २० हजारांची साखळी
यावेली झालेल्या झटापटीत सविता मालपेकर यांचा पंजाबी ड्रेस कुर्ता सोनसाखळी मध्ये अडकल्यामुळे फाटला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, सविता मालपेकर यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या सोनसाखळीची किंमत १ लाख २० हजार रुपये असून, शिवाजी पार्क पोलिसांनी सोनसाखळी चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कसबे यांनी दिली.
सीसीटीव्ही यंत्रणेची गरज
शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही, सीसीटीव्ही फक्त मुख्य प्रवेशद्वारांजवळच आहे, त्यामुळे सीसीटीव्ही हे सर्व गेटवर बसवण्याची गरज आहे. येथे ज्येष्ठ नागरिक छोटी मुले, महिला यांचा वावर असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे अभिनेत्री सविता मालपेकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः आषाढी एकादशीनिमित्त मोदी-शहांकडून मराठीत शुभेच्छा! निवडणुकांचे वारे की आणि काही…?)
Join Our WhatsApp Community