Investment Scam : टोरेस कंपनीकडून 500 कोटींची फसवणूक; सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी केली कार्यालयांबाहेर गर्दी

286
Torres कंपनीमुळे सव्वा लाख गुंतवणूकदारांचे निघाले दिवाळे; तिघांना अटक; मुख्य आरोपी युक्रेनमध्ये पळाले
  • प्रतिनिधी

झटपट पैसे कमविण्याच्या नादात ‘टोरेस’ या परदेशी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दादर येथे असणाऱ्या टोरेस कंपनीच्या शोरूमवर सोमवारी शेकडो गुंतवणूकदार दाखल झाले होते, परंतु तत्पूर्वी कंपनीने मुंबई, मिरारोड, वाशी, सानपाडा येथील शोरूमला कुलूप लावून पोबारा केल्याचे समोर आले आहे.(Investment Scam)

याप्रकरणी गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन टोरेस कंपनीच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात १३ कोटींच्यावर फसवणुकीची रक्कम असून तक्रारदार तक्रार करायला येत असल्यामुळे हा आकडा शंभर कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. तसेच इतर शहरांमध्ये असलेल्या टोरेस कंपनीच्या शोरूमवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फसवणुकीचा आकडा ५०० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Investment Scam)

(हेही वाचा – Investing in Gold : यंदाही सोन्याच्या गुंतवणुकीतून २० टक्के परतावा शक्य असल्याचा संशोधन संस्थांचा अंदाज)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टोरेस’ ही रशियन कंपनी आहे. या कंपनीचे मुंबईतील दादर पश्चिम शिवाजी मंदिर जवळ मुख्य कार्यालय तसेच शोरूम होते. तर सानपाडा, बोरीवली, मिरारोड येथे टोरेसचे शोरूम होते. या बरोबर राज्यातील अनेक शहरात या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या. या कंपनीला फेब्रुवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार होते. टोरेस या कंपनीने प्रथम हिरेजडित दागिने, तसेच रत्न विक्री सुरू केली होती. त्यानंतर त्यांच्या शोरूम मधील दागिने विकत घेणाऱ्यांसाठी गुंतवणुकीच्या रकमेत महिन्याला ७ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. १० हजार रुपयांपासून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक आठवड्यात एक ठराविक रक्कम ५२ आठवडे जमा होतील, गुंतवणूक केलेली रक्कम १५ आठवड्यात तुमच्या खात्यात जमा केली जाईल, त्यानंतर उर्वरित आठवड्यात येणारी रक्कम ही बोनस असेल असे सांगण्यात येत होते. म्हणजेच दाम तिप्पट अशी ही योजना टोरेस कंपनीने आणली होती, सुरुवातीला गुंतवणूकदारांच्या खात्यावर प्रत्येक आठवड्यात एक ठराविक रक्कम येऊ लागल्यानंतर प्रत्येकांचा कंपनीवर विश्वास वाढला होता. (Investment Scam)

दरम्यान कंपनीने एकामागे एक स्कीम सुरू केली, तसेच साखळी योजना सुरू केली तसेच व्याजदर वाढवून ७ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आले होते. मागील काही महिन्यात टोरेस कंपनीत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात वाढले होते, झटपट पैसा कमविण्याच्या नादात अनेकांनी आपले दागिने गहाण ठेवून, कोणी घर गहाण ठेवून टोरेस कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी देखील मोठी गुंतवणूक केल्याचे सूत्रांनी सांगितले. दादर, मिरारोड, बोरिवली, सानपाडा या ठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्याची संख्या जवळपास २ ते ३ लाखांच्यावर गेली होती. (Investment Scam)

(हेही वाचा – राऊतांना पक्षातून काढू की जिल्हाप्रमुखांना काढू ? Uddhav Thackeray यांची द्विधा मनस्थिती)

मागील काही आठवड्यापासून मोठ्या रकमेची गुंतवणूकदारांची प्रत्येक आठवड्याला येणारी रक्कम बंद झाल्यामुळे चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी टोरेस कंपनीच्या दादरच्या शोरूमला भेट दिली. त्यांना थातुरमातुर उत्तरे देऊन लवकरच तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आठवड्याला येणारी सर्वांची रक्कम बंद झाल्यामुळे सोमवारी सकाळीच गुंतवणूकदारांनी दादर आणि सानपाडा येथील शोरूम येथे गोळा झाले. शेकडो जणांचा ताफा बघून टोरेस शोरूम मॅनेजर यांनी शोरूम बंद करण्याचा प्रयत्न केला असता गुंतवणूकदारांनी त्यांना अडवून काही गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. सानपाडा येथील गुंतवणूकदारांनी शोरूमची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन गुंतवणूकदारांना रोखले आणि रीतसर तक्रार दाखल करण्यास सांगितले. दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ गुंतवणूकदारांची तक्रार दाखल करून टोरेस कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात १३ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून शेकडो गुंतवणूकदार पोलीस ठाण्याच्या बाहेर तक्रार दाखल करण्यासाठी उभे आहेत. पोलिसांकडून प्रत्येकाची तक्रार नोंदवून त्यांचा जबाब घेतला जात आहे. या गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम शेकडो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली असून हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Investment Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.