Dr. Bhau Daji Lad Museum : इतिहास, वारसा समजण्‍यासाठी संग्रहालयांची भूमिका मोलाची

47
Dr. Bhau Daji Lad Museum : इतिहास, वारसा समजण्‍यासाठी संग्रहालयांची भूमिका मोलाची
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

संग्रहालये ही संस्‍कृती आणि इतिहासाची प्रतीके आहेत. समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची ती साक्षीदार असतात. भावी पिढीला आपला संपन्‍न इतिहास, वारसा समजण्‍यासाठी संग्रहालये मोलाची भूमिका बजावतात. मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केलेले डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) प्रेरणा व माहितीचा स्रोत ठरण्‍याबरोबरच पर्यटनाला प्रोत्साहन देईल. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा ठाम विश्‍वास राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आवारातील नूतनीकरण केलेल्‍या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी करण्‍यात आले, त्‍यावेळी ते बोलत होते. कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्‍त (उद्याने) चंदा जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – वक्फच्या नावाने बळकावलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर गरिबांसाठी घरे बांधणार; CM Yogi Adityanath यांची घोषणा)

मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाची, महानगराची संस्कृती, लोकजीवन आणि इतिहास कळतो. आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) उभारणीचा उद्देश असतो. नागरी विकास आणि त्याची स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक आहे. आपला देश संस्कृतीची खाण असून जगातील सर्वात जुनी म्‍हणजेच १० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील सिंधू संस्कृती स्थित्यंतरांना सामोरे जात आजही नांदते आहे. हडप्‍पा, मोहेंजोदाडो, राखीगढी, भिरडाणा इत्यादी प्राचीन स्थळं ही आपल्या विकसित संस्‍कृतीची उदाहरणे आहेत. आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारसांचे जतन करू शकलो नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. तथापि, अलिकडच्‍या काळात या संदर्भात जागृती झाली आहे. पुरातन, ऐतिहासिक, कलात्‍मक संस्‍कृतीचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्‍य आहे, असेदेखील फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, एखाद्या महानगराची श्रीमंती ही तेथील इमारती, रस्‍ते, श्रीमंत लोकांवरून नव्‍हे तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून ठरवली जाते. जगातील सर्व महानगरांमध्‍ये उत्तमोत्‍तम अशी संग्रहालये आहेत. मुंबईतील असेच एक दर्जेदार, उत्तम संग्रहालय वास्तू नूतनीकरणानंतर नागरिकांसाठी आज खुले होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. भाऊ दाजी लाड हे व्यवसायाने डॉक्टर होते. अनेक भाषांवर त्‍यांचे प्रभुत्‍व होते. त्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पित केले. ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी या संग्रहालयासाठी अनेक दुर्मीळ वस्तू संकलित केल्या. निधी संकलन कामात पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास ५० वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्रातले सर्वात जुने, तर देशातील तिसरे सर्वात जुने संग्रहालय असा लौकिक असलेल्‍या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची (Dr. Bhau Daji Lad Museum) मुंबईच्या इतिहासात अग्रणी भूमिका राहिली आहे. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय नामकरणाच्‍या ५० वर्षानंतर नव्या रुपात, दिमाखात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय कायम आकर्षण राहिले आहे आणि यापुढेही कायम राहील. यातील दुर्मीळ वस्तू, छायाचित्रे, शिल्‍पाकृती या माध्यमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळेल.

(हेही वाचा – २४ वर्षे जमीन ताब्यात ठेवून अधिसूचना नाही; म्हाडा आणि सोलापूर महापालिकेला Bombay High Court ने ठोठावला दंड)

मुंबई महानगरपालिकेने संग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum) नूतनीकरण करून उत्‍कृष्‍ट कामगिरी केली आहे. नूतनीकरण कामाचा दर्जा हा सर्वोत्कृष्ट आहे. भविष्यात हा दर्जा ‘क्युरेटर’ कायम राखतील. मोठ्या संख्येने नागरिक संग्रहालयात येतील, तेव्‍हादेखील दर्जा टिकून राहील, याची दक्षता घ्यावी. संग्रहालय नेहमी अधिक समृद्ध दिसेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रास्‍ताविकातून संग्रहालय नूतनीकरणामागील भूमिका विषद केली. उप आयुक्‍त (उद्याने) चंदा जाधव यांनी आभार मानले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.