सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेताना योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी रस्ते अपघातांमध्ये जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी नजीकच्या रुग्णालयात योजनेचा लाभ देणारे धोरण तयार करण्याचे निर्देश दिले.
योजनेच्या पोर्टलवर प्रलंबित असलेल्या १,०७५ तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच नोटीस पाठवून खुलासा घ्यावा, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. तक्रारींची निपटारा प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करावी आणि अंमलबजावणी सहाय्य संस्थांकडून कार्यवाही होत नसल्यास, संबंधित संस्थांवर कारवाईचे निर्देश दिले.
(हेही वाचा – Vishalgad Fort : विशाळगडावर जाणार्यांच्या संदर्भात पूर्ण नोंदी ठेवाव्यात; विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीची मागणी)
तक्रार निवारणासाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती विकसित करून कठोर कारवाईच्या तरतुदी करण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तक्रारींवर वेळेत कार्यवाही न करणाऱ्या संस्थांवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही मंत्री आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिला.
ही योजना सर्वसामान्यांना अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी, तसेच अपघातग्रस्त आणि गरजू रुग्णांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आयुष्मान कार्डच्या (Ayushman Card) १०० टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाची आरोग्य विभागासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. सध्या योजनेनुसार १ हजार ३५६ उपचार पद्धती आहे. या पद्धतींचा आढावा घेऊन त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (National Health Authority) उपचार पद्धतीपैकी आवश्यक उपचारांचा समावेश करणे, सध्याच्या उपचार पद्धतीत बदल किंवा सुधारणा करणे, नवीन उपचार पद्धतींचा समावेश, शासकीय रूग्णालयांच्या राखीव प्रक्रियांपैकी काही उपचार आवश्यकतेप्रमाणे खाजगी रूग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी आरोग्य मंत्री यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community