-
ऋजुता लुकतुके
यंदाची पहिली टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने एक खळबळजनक दावा केला आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोना लस न घेण्यावरून जो वाद निर्माण झाला होता, त्या दरम्यान, ऑस्ट्रेलियात विषप्रयोग झाल्याचं जोकोविचचं म्हणणं आहे. ‘माझी तब्येत तेव्हा ठिक नव्हती. म्हणून मी तपासणी करून घेतली तेव्हा मला कळलं की, मेलबर्नमध्ये मी राहत असलेल्या हॉटेलमधील मला दिलं गेलेलं अन्न विषबाधित होतं,’ असं जोकोविचने जीक्यू साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Novak Djokovic)
(हेही वाचा- केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्येही घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चे सूर; Dada Bhuse यांची माहिती)
तिथे राहिल्यानंतर माझ्या शरीरात डॉक्टरांना शिसं आणि पाऱ्याचे अंश सापडले होते, असं जोकोविच मुलाखतीत म्हणतो. ‘मी सर्बियाला परतल्यावर मला ही गोष्ट कळली. मी त्यानंतर उघडपणे त्यावर कधी बोललो नाही. पण, तो एकूणच अनुभव भयानक आणि खेदजनक होता,’ असं जोकोविचचं म्हणणं आहे. २०२२ हा कोरोनाचा काळ होता. आणि लॉकडाऊननंतर स्पर्धा नव्याने सुरू होत होत्या. मेलबर्नमध्ये स्पर्धेसाठी बायो-बबल असताना जोकोविचने कोरोनाची लस न घेतल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे आयोजकांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला स्पर्धेत खेळायला परवानगी नाकारली. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन इनिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेऊन ऑस्ट्रेलियातून परत पाठवलं होतं. (Novak Djokovic)
जोकोविचला या घटनेबद्दल राग आहे. त्याचा कोरोना लशीवर विश्वास नव्हता. त्यामुळे दोनदा कोव्हिड होऊनही त्याने लस घेतली नव्हती. आणि त्यामुळे स्पर्धेत मात्र प्रचंड गोंधळ आणि वाद निर्माण झाला होता. त्या प्रसंगानंतर जोकोविच २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन खेळला आणि जिंकलाही. आणि आता ३७ वर्षीय जोकोविच पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळणार आहे. (Novak Djokovic)
(हेही वाचा- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर BJP ची साथ सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध)
ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल आपल्या मनात राग नाही, असं मात्र जोकोविचने आवर्जून स्पष्ट केलं आहे. ‘मी गेल्या दोन वर्षांत ज्या ज्या ऑस्ट्रेलियन लोकांना तिथे किंवा बाहेर भेटलो, त्या सगळ्यांनी येऊन माझी माफी मागितली आहे. त्यांचं सरकार काय करतंय, हे त्यांनाही माहीत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. माझा ऑस्ट्रेलियन जनतेवर राग नाही. त्यांनी नंतरही माझं स्वागतच केलं. सरकारनेही नंतर माझा व्हिसा पुन्हा दिला,’ असं जोकोविच शेवटची सांगतो. (Novak Djokovic)
जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतला सर्वाधिक यश मिळवणारा खेळाडू आहे. यंदा तो आपल्या अकराव्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. (Novak Djokovic)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community