Torres Investment Scam : दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक

या फसवणुकीच्या (Torres Investment Scam) प्रकाराला जास्त करून निवृत्त झालेल्या व्यक्तीं मोठ्या प्रमाणावर बळी पडतात.

85
  • प्रवीण दीक्षित

टोरेस ज्वेलर्स (Torres Investment Scam) दादर ह्यांनी २५०० हून अधिक लोकांना फसवून १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम लुटल्याची तक्रार नुकतीच पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिसांनी ३ लोकांना पकडून ७.४ कोटी रक्कम हस्तगत केल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार होताना दिसतात. ह्या गुन्ह्यांची सर्वसाधारण पद्धत अशी असते की, एखादी अपरिचित व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते आणि जाहिरात करते की, तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेतील ठेवलेल्या मुदतीच्या ठेव्यांच्या दरापेक्षा जवळजवळ दुप्पट दर असेल. त्याशिवाय तुम्हाला घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोच मिळतील.

अशी होते फसवणूक 

सुरुवातीला दोन-तीन महिने ही व्यक्ती सांगितल्याप्रमाणे व्याज देते आणि तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुमच्यामार्फत अन्य व्यक्तींनाही पैसे गुंतवणूक करण्याचे आवाहन करते. जेवढ्या अधिक व्यक्तींकडून तुम्ही रक्कम आणाल त्यातील काही टक्के तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात. काही व्यक्तींना मिक्सर, मायक्रोवेव्ह, घरगुती वापराचे डबे इत्यादी साहित्यही दिले जाते. आठ ते नऊ महिन्यानंतर दर महिन्याला मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. फोन स्वीकारत नाही. वर्षभरात ही व्यक्ती एक दिवस अचानक नाहीशी होते आणि भाड्याने घेतलेली जागा रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणूक (Torres Investment Scam) करणारी व्यक्ती तो पर्यंत परदेशात गेलेली असते. जातांना अनेकांनी ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा गायब झालेल्या असतात. त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले की असे लोक पोलिसांकडे तक्रार करतात. तोपर्यंत मधे बराच काळ गेलेला असतो. पोलिसांच्या प्रयत्नांनी फसवणूक करणारी व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर पकडली गेलीच तरीही लोकांनी ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते. ही होणारी फसवणूक  ponzi schems  नावाने प्रसिद्ध आहे.

निवृत्त व्यक्ती जास्त फसतात 

या फसवणुकीच्या (Torres Investment Scam) प्रकाराला जास्त करून निवृत्त झालेल्या व्यक्तीं मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. कमी वेळात रक्कम दुप्पट होईल, मित्राने, ओळखीच्या माणसाने पैसे ठेवायला सांगितले त्यामुळे विशेष विचारपूस न करता अशा व्यक्ती आयुष्यभराची ठेव त्या माणसाच्या जवळ बिनधास्तपणे देत असतात. जेवढे आर्थिक मागासपण जास्त तेवढे तेथील व्यक्तींना फसवण्यात ह्या अपराधी व्यक्ती तरबेज असतात. अशा प्रकारे एकाच वेळी अनेक जिल्ह्यात, अनेक राज्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार उघडकीस येत असल्याने प्रत्येक पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पोलीस उपायुक्त नेमलेला आहे. फार मोठ्या रकमेची अफरातफर असेल तर त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचे काम दिले आहे. अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता केली असल्यास ती जप्त करून येणार्‍या पैशातून पीडित व्यक्तींना ही रक्कम परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. आर्थिक फसवणुकीच्या (Torres Investment Scam) गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून शिक्षा होण्यापेक्षा पीडित व्यक्तीस गेलेली रक्कम परत मिळणे जास्त महत्त्वाचे असते.

(हेही वाचा Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त)

शहाणपण महत्वाचे  

शासनातर्फे जरी वरील व्यवस्था राबवलेली असली तरीही कष्टाने मिळवलेले पैसे अशाप्रकारे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्यापासून दूर राहणे हे शहाणपणाचे आहे. भारत सरकारतर्फे आणि रिझर्व बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत. परंतु तरीही अशा प्रकारे फसवणारे आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी वारंवार नजरेस येत असतात. आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून, शासनमान्य शेड्युल बँका, शेअरमार्केट, म्युचअल फंड ह्याठिकाणी रक्कम गुंतवणेच योग्य आहे. अथवा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.

भगवद् गीतेवरील (अध्याय 16 शलोक 7 वा) टीकेत ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे, “का दिधलें मागुती येईल, की नये हें पुढील. न पाहाता दे भांडवल, मूर्ख चोरां.” म्हणजे, दिलेले मिळेल वा न मिळेल, हा विचार न करता पुढील, मूर्ख जैसे भांडवल, देत असे चोरासी.

हे समजून लोकांनी शहाणपणे वागण्याची गरज आहे.

(लेखक निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.