ISRO च्या अंतराळ मोहिमांमध्ये गगनयान अंतर्गत मानवरहित मोहिमेचा समावेश

43
ISRO च्या अंतराळ मोहिमांमध्ये गगनयान अंतर्गत मानवरहित मोहिमेचा समावेश

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2025 साठी इस्रोच्या (ISRO) आगामी प्रमुख अंतराळ मोहिमांचा उच्चस्तरीय आढावा घेतला. यावेळी इस्रोचे मावळते अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, त्यांचे उत्तराधिकारी डॉ. व्ही. नारायणन आणि IN-SPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोएंका यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 2025 च्या पूर्वार्धात तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे दर्शन घडवणाऱ्या प्रमुख मोहिमांच्या भरगच्च वेळापत्रकासाठी सज्ज झाली आहे. या मोहिमांमध्ये गगनयानच्या मानवरहित कक्षीय चाचणी मोहिमेचा समावेश आहे.या महत्त्वाच्या प्रक्षेपणामुळे भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा मार्ग खुला होणार आहे, ज्यामुळे यानातील कर्मचाऱ्याची सुरक्षा आणि रिकव्हरी प्रक्रिया यांची पुष्टी होणार आहे.

(हेही वाचा – Love Jihad : पाकिस्तानी तरुणीने ग्रीकमधील प्रेयसीची केली हत्या)

त्याशिवाय दोन जीएसएलव्ही मोहिमा, एलव्हीएम-3 चे एक व्यावसायिक प्रक्षेपण आणि बहुप्रतिक्षीत इस्रो-नासा सहकार्य मोहिमेंतर्गत निसार उपग्रह प्रक्षेपण या मोहिमा येत्या काही महिन्यात होणार आहेत. जानेवारी महिन्यात जीएसएलव्ही-एफ15 मोहिमे अंतर्गत एनएव्हीआयसी कॉन्स्टेलेशनचे जास्त चांगल्या प्रकारे आकलन करणाऱ्या एनव्हीएस-02 या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करून स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आण्विक घड्याळांच्या मदतीने भारताच्या स्थितीनिश्चिती आणि दिशादर्शन क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसएलव्ही-एफ16 मोहिमे अंतर्गत नासाच्या सहकार्याने निसार या अतिशय उच्च तंत्रज्ञानाने युक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. अत्याधुनिक रडार इमेजिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला निसार कृषी, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान निरीक्षण याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती पुरवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. (ISRO)

(हेही वाचा – Air Pollution रोखण्यासाठी डिझेल वाहने, लाकूड/कोळशाच्या भट्ट्या टप्प्याटप्प्याने बंद करा; मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्ताव)

एलव्हीएम3-एम5 ही व्यावसायिक मोहीम मार्चमध्ये होणार असून यामध्ये अमेरिकेतील एएसटी स्पेसमोबाईल सोबतच्या कंत्राटांतर्गत ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह स्थापित केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत इस्रोचे वाढते महत्त्व यातून अधोरेखित होत आहे. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील भारताचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी इस्रोच्या (ISRO) वाटचालीची डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली. यावेळी डॉ. एस. सोमनाथ यांनी आपल्या कारकिर्दीची आठवण करत, आगामी मोहिमांच्या यशस्वितेबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. तर डॉ. व्ही. नारायणन यांनी इस्रोच्या जागतिक क्षेत्रातील दबदब्यात वाढ करण्याचा धोरणात्मक आराखडा सादर केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.