- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय साधून तातडीने अतिक्रमण तोडण्यासंदर्भातील कारवाईला वेग द्यावा. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम राबविण्यात यावी. विविध भागात निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी संबंधित परिमंडळीय पोलीस उप आयुक्त तसेच पोलीस ठाण्याकडून लागणारे मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करुन दिले जावे, असे निर्देश महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी शुक्रवारी दिले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकामी कोणी चालढकल केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. जोशी यांनी दिला आहे. (Unauthorized Constructions)
मुंबई महानगरातील अतिक्रमण निर्मूलन विषयक कार्यवाहीचा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात शुक्रवारी १० जानेवारी २०२५ आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे यांच्यासह सर्व संबंधित सहायक आयुक्त, अधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, अनधिकृत बांधकामाबाबत प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी. अतिक्रमण निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे योग्य नियोजन करुन निष्कासनाची कारवाई तत्काळ सुरू करावी. (Unauthorized Constructions)
(हेही वाचा – मास्टर लिस्टवरील पात्र भाडेकरुंच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा; MHADA उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचा महत्त्वपूर्ण निर्णय)
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, कलम १५२ (ए) नुसार अनधिकृत बांधकामांवर मालमत्ताकराच्या २०० टक्के दंड आकारणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, तोडक कारवाई करतानाच अनधिकृत बांधकामांना दंडाची नोटीस देणे, दंड आकारणी करण्याची कार्यवाही करावी. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०२५ अखेर मालमत्ताकर संकलन अधिक वेगाने करावे, असेही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. जोशी यांनी निर्देशित केले. यावेळी अनधिकृत बांधकाम संदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेताना मुंबई महानगरपालिकेची बाजू न्यायालयात अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी विधीज्ज्ञांची नेमणूक करावी, असेही निर्देश अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. (Unauthorized Constructions)
सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) विनायक विसपुते म्हणाले की, मुंबई अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईची धडक मोहीम जानेवारी ते मार्च या काळात सलगपणे राबविण्यात येणार आहे. कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये यावर सर्व पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवावे व त्यावर तत्पर कारवाई करावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. अनधिकृत बांधकामावरील दंडात्मक मालमत्ता करवसुलीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचा सूचना विभागस्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही विसपुते यांनी नमूद केले. (Unauthorized Constructions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community