BEST : बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाची खुर्ची नको कुणाला; अधिकारी टिकत नाही वर्षांपेक्षा जास्त काळ!

331
BEST : बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाची खुर्ची नको कुणाला; अधिकारी टिकत नाही वर्षांपेक्षा जास्त काळ!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बेस्ट (BEST) उपक्रम तोट्यात चालला असून बेस्टचा कारभार हा महापालिकेच्या अनुदानावरच चाललेला असताना या उपक्रमात कोणीही महाव्यवस्थापक स्थिर टिकताना दिसत नाही. बेस्टचे महाव्यवस्थापक असलेल्या सुरेंद्र बागडे यांच्यानंतर दोन महाव्यवस्थापक होऊन गेले असून कुणीही वर्ष ते दीड वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेले पहायला मिळालेले नाही. त्यामुळे बेस्टला आर्थिक शिस्त लावून उपक्रमाला आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सक्षम महाव्यवस्थापकाची गरज असतानाही बेस्टमध्ये कुणीच जास्त काळ टिकत नसल्याने उपक्रमाला चांगले दिवस येणार कसे असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे.

बेस्ट (BEST) उपक्रम तोट्यात जात असल्याने महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमाला काटकसरीच्या उपाययोजना देत त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना तत्कालिन बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेद्र बागडे यांना दिले होते. बागडे हे काही वर्षे बेस्टच्या (BEST) महाव्यवस्थापकपदी विराजमान होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या रिक्त जागी २०२२मध्ये लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. लोकेश चंद्र बेस्टमध्ये स्थिरस्थावर होत नाही तोच मे २०२२ मध्ये लोकेश चंद्र यांची बदली झाली आणि त्यांच्या रिक्त जागी मे २०२३मध्ये विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यातच सिंघल यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली.

(हेही वाचा – ISRO च्या अंतराळ मोहिमांमध्ये गगनयान अंतर्गत मानवरहित मोहिमेचा समावेश)

परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिग्गीकर यांची बदली दिव्यांग कल्याण विभागात प्रधान सचिवपदी करण्यात आले. आणि डिग्गीकर यांच्या रिक्तपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु दोन ते तीन दिवसांत हर्षदीप कांबळे यांनी पदभार स्वीकारण्याऐवजी आपली वर्णी अन्य विभागात लावून घेतली. त्यामुळे बेस्टच्या (BEST) महाव्यवस्थापक पदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वीच समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिववदी वर्णी लावून घेतली. त्यामुळे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कारभार महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टचा कारभार सक्षम महाव्यवस्थापकाच्या हाती नसल्याने बेस्टला चांगले दिवस कसे येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेस्ट (BEST) समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की, बेस्टला सक्षम बनण्यासाठी महाव्यवस्थापकही सक्षम असायला हवा. महापालिकेनेही बेस्टबाबत सकारात्मक धोरण स्वीकारायला हवा असे स्पष्ट करत बेस्ट नफ्यात येण्याऐवजी ती सुरळीत चालणे महत्वाचे आहे. त्यामुळे बेस्ट आणि महापालिका दोघांनीही एकत्र राहून काम केले पाहिजे. त्यामुळे बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मुक्तपणे काम करण्याची मुभा महापालिकेने द्यायला हवी आणि महापालिका आणि बेस्टला काम करण्यासाठी सरकारने मदत करायला हवी असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.