-
ऋजुता लुकतुके
टाटा समुहातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा एलेक्सीच्या तिमाही निकालांनी शेअर बाजाराला निराश केलं आहे. आणि त्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारत या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण होऊन हा शेअर ५,९२४ पर्यंत खाली आला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यातील उच्चांक ९,०८२ इतका आहे. आणि या किमतीपासून शेअर सध्या ३५ टक्के खाली आहे. पण, विशेष म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये कंपनीने हा उच्चांक गाठला होता. आणि त्यानंतर जेमतेम ४ महिन्यात शेअरमध्ये ही विलक्षण घसरण पाहायला मिळाली आहे. (Tata Elxsi Share Price)
ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या एकूण नफ्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.५ टक्क्यांनी घट आली. आणि निव्वळ नफा १९९ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. पण, त्यापेक्षा जास्त बाधक ठरला तो कंपनीचा एकूण झालेला खर्च. हा खर्च तब्बल ७ टक्क्यांनी वाढला. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि इतर खर्च ७१३ कोटी रुपयांच्या घरात गेले आहेत. (Tata Elxsi Share Price)
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राघवन यांनी या कामगिरीविषयी भाष्य करताना भारत आणि जपानमध्ये कंपनीने मिळवलेलं यश अधोरेखित केलं. ‘आमचं सध्या भारत आणि जपानच्या बाजारपेठेवर लक्ष आहे. आणि तिथे आम्ही चांगली कामगिरी केली आहे. भारतात सेवाचा विस्तार २१ टक्क्यांनी झाला आहे. तर जपानसह इतर उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये आमचा विस्तार ६६ टक्के झाला आहे. आणि हे यश आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ असं राघवन म्हणाले. (Tata Elxsi Share Price)
(हेही वाचा- स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात)
कंपनीचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या आठवड्यात टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीसाठी मॉर्गन स्टॅनले या जागतिक संशोधन संस्थेनं दिलेल्या विक्रीचा सल्लाही कारणीभूत आहे. कंपनीसाठी विस्ताराच्या संधी पुरेशा नसल्याचं मॉर्गन स्टॅनलीने अहवालात म्हटलं आहे. टाटा एलेक्सी ही टेक आणि टेक डिझाईनिंग करणारी कंपनी आहे. ऑटो, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन, दळणवळण या क्षेत्रात ही कंपनी टेक सेवा पुरवते. (Tata Elxsi Share Price)