- ऋजुता लुकतुके
मूळातच कल्याण ज्वेलर्स हा शेअर त्याच्यातील मोठ्या चढ उतारासाठी प्रसिद्ध आहे. पण, सध्या या शेअरमध्ये झालेली घसरण सगळ्यांनाच बुचकाळ्यात पाडत आहे. कारण, डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ताळेबंद अगदी चांगला होता. ज्या कंपन्यांचे पहिल्या आठवडयात तिमाही निकाल जाहीर झाले त्यातील एक मोठी कंपनी कल्याण ज्वेलर्स ही होती. शिवाय सणासुदीचा आणि लग्नांचा हंगाम असल्यामुळे फक्त भारतातच नाही तर आशियाई देशांमध्येही दागिन्यांना मागणी असेल त्याचा फायदा शेअरला मिळेल, असा जाणकारांचा होरा होता. पण, तो खोटा ठरवत कंपनीचा शेअर आठवड्याभरात २५ टक्क्यांनी खाली आला आहे. (Kalyan Jewellers Share Price)
शुक्रवारीही शेअरमध्ये ५.६ टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर ६६५ वर बंद झाला. इतकंच नाही तर अलीकडे झालेल्या घसरणीमुळे या कंपनीचं ६८,७९६ कोटी रुपयांचं भागभांडवल कमी झालं आहे. (Kalyan Jewellers Share Price)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड १८ जानेवारीला?)
इतक्या पडझडीनंतरही संशोधन संस्था मात्र या शेअरबद्दल सकारात्मक आहेत. याचं कारण नोंदणीनंतर एका वर्षांत हा शेअर ७४ टक्क्यांनी वर गेला आहे, तर मागच्या २ वर्षांत या शेअरने ४३१ टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यामुळे इतक्या उसळीनंतर ही नफारुपी विक्री आहे असं मोतीलाल ओस्वाल संस्थेचं म्हणणं आहे. त्यांनी आजही शेअरला खरेदीचा सल्ला दिला आहे आणि २०२५ मध्ये हा शेअर ८२५ रुपयांपर्यंत जाईल असा त्यांचा अंदाज आहे. (Kalyan Jewellers Share Price)
कंपनीचा बिटा ०.६ इतका आहे. याचा अर्थ कंपनीत खूप मोठे उतार चढाव अपेक्षित नाहीत असा होतो. तर कल्याण ज्वेलर्सच्या एकूण विक्रीत ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे, याकडे ओसवाल यांनी लक्ष वेधलं आहे. आगामी कालावधीत विक्री आणखी वाढेल असा त्यांचा अंदाज आहे. शिवाय नवीन आर्थिक वर्षांत कंपनी १७० नवीन शोरुम उघडणार आहे. यातील फक्त १५ दक्षिण भारतात आणि बाकीच्या उत्तर, पश्चिम भारत आणि परदेशात असणार आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून येईल, असं मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात म्हटलं आहे. तर सेंट्रम ब्रोकिंग आणि वेल्थमिल्स सेक्युरिटीज यांनीही कल्याण ज्वेलर्सचा शेअर राखून ठेवण्याचाच सल्ला दिला आहे. (Kalyan Jewellers Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी-विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community