Kumbhavade : कोकणात प्रथमच महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध

116
Kumbhavade : कोकणात प्रथमच महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध
Kumbhavade : कोकणात प्रथमच महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध

कुंभवडे (Kumbhavade ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ (megalithic monoliths) स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात आणली. यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडणार आहे. कोकणातील या प्रथम शोधाची घोषणा लळीत यांनी पुणे येथे ‘आय-सार्क’ राष्ट्रीय परिषदेत केली. भारतात महापाषाण संस्कृतीचा काळ साधारणपणे इ.स.पूर्व १५०० ते ४०० वर्षे मानला जातो.

पुणे (Pune) येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या (Sinhagad Institute) श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल, आय-एसएआरसी) पाचवे राष्ट्रीय अधिवेशन दि. १० व ११ रोजी झाले. या परिषदेत लळीत यांनी आपला याबाबतचा शोधनिबंध सादर केला. बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. शांती स्वरुप सिन्हा सत्रप्रमुख आणि डॉ. अरविंद सोनटक्के अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील लळीत हे निवृत्त शासकीय अधिकारी असून कातळशिल्प अभ्यासक आहेत. ६ मे २००१ रोजी त्यांनी सिंधुदुर्गातील पहिल्या कातळशिल्प स्थळाचा शोध लावला. गेली २४ वर्षे ते यावर संशोधन करीत असून त्यांनी या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.

(हेही वाचा – Hawkers : टोरेसमुळे महापालिका आणि पोलिसांना रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आतील फेरीवाले दिसले?)

लळीत यांना एका संशोधकीय सर्वेक्षणात कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची एकुण सात एकाश्मस्तंभ स्मारके आढळून आली. ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ होय. भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झालेली नसली तरी सर्वसाधारणपणे इसपु पंधराशे ते चारशे वर्षे हा काल महापाषाण संस्कृतीचा मानला जातो. या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते.

एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जात असत. मोठे दगड (मेगालिथ) जमिनीत उभे पुरले जात असत. जगाच्या अनेक भागात असे एकाश्मस्तंभ आढळतात. अशी एकाश्मस्तंभ स्मारके इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक वगैरे देशात आढळली आहेत. महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके मानली जातात. महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात अशी एकाश्मस्तंभ स्मारके याआधी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडु, मणिपूर राज्यातही अशी एकाश्मस्तंभ स्मारके आढळतात.

लळीत यांना कुंभवडे येथे एकुण ७ (सात) एकाश्मस्तंभ आढळून आले. ते गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागले गेले आहेत. सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरुन नाणार फाटा – कुंभवडे – उपळे रस्ता जातो. या रस्त्यावर मंदिराकडे वळणाऱ्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तिनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजुला सुमारे तिनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकुण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे. या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असुन तीन उभ्या स्थितीत आहेत. हे एकाश्मस्तंभ स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडांमधुन खोदून काढलेले आहेत. उभ्या असलेल्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम आहे. सर्वात लहान एकाश्मस्तंभाची उंची २.५ फुट, रुंदी २ फुट व जाडी ५ इंच आहे. सर्वात मोठ्या एकाश्मस्तंभाची उंची सव्वाआठ फुट, रुंदी ३ फुट व जाडी १० इंच आहे.

कोकणचा (Konkan) प्रागैतिहास अद्याप अज्ञात आहे. सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भांशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते. काही वर्षांपुर्वी साधारणपणे मध्याश्मयुगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्वाचा दुवा सापडला आहे. यावर्षी मला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळले आहेत. कोकणात एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असा दावा श्री. सतीश लळीत यांनी केला आहे.

कोकण प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील, प्राचीन काळातील मानवी संस्कृतींचा शोध घेण्यासाठी अत्यंत कमी साधने आणि संदर्भ उपलब्ध असल्यामुळे हा काळ यादृष्टीने अंधारयुग (डार्क एज) म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षात गुहांची मानवी वसतिस्थाने, शिळावर्तुळे, कातळशिल्पे असे अनेक संदर्भ उजेडात येऊ लागले आहेत. यामुळे या अंधारयुगाची एकएक खिडकी किलकिली होऊ लागली आहे. कुंभवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांच्या (मेनहिर) या शोधामुळे या साखळीतील आणखी एक महत्वाचा दुवा मिळाला आहे, असे लळीत यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत कोकणात सापडलेली मानवी वसतिस्थाने, गुहा, दगडी शस्त्रे, शिळावर्तुळे, कातळशिल्पे व एकाश्मस्तंभ यांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण, संशोधन व अर्थान्वयन होणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे कोकण प्रदेशातील प्राचीन मानवी संस्कृतींच्या अस्तित्वावर नवा प्रकाश पडु शकेल. या सर्व ठिकाणांचे संरक्षण व जतन करण्यासाठी शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर केली पाहिजेत. अज्ञान, अनास्था, जमिनींची विक्री व विकास, खाणी, विविध प्रकल्प यात या पुरातत्व स्थळांचे नुकसान होण्याची किंवा ती नष्ट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कुंभवडे येथील हे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालिन संस्कृतींच्या चालीरिती, श्रद्धा, उपासनापद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार आहेत, अशी खात्री लळीत यांनी त्यांच्या शोधनिबंधात व्यक्त केली आहे.

दरम्यान, या परिषदेत राज्यासह देशातील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. शोधनिबंध सादरीकरणासोबतच मंदिर स्थापत्य या विषयावर वास्तुरचनाकार ॲडम हार्डी (ब्रिटन), डॉ. शिखा जैन, डॉ. उज्वला पळसुले यांची तर मूर्तीशास्त्र, गुहाचित्रे व लेणी या विषयावर प्रो. दीपक कन्नाल, डॉ. शांतीस्वरुप सिन्हा, प्रा. आर.एच. कुलकर्णी, प्रा. उषाराणी तिवारी यांची व्याख्याने झाली. परिषद यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत गणवीर, सचिव डॉ. शांता गीते, कोषाध्यक्ष डॉ. दत्ता हिंगमिरे, उपाध्यक्ष डॉ. नीतिन बावले, माजी अध्यक्ष डॉ. अरविंद सोनटक्के, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, निमंत्रक विभागप्रमुख डॉ. शोभन केळकर, आर्कि. नेहा मसलेकर, सहनिमंत्रक आर्कि. अमोल दहिवडकर, आर्कि. योगिता पंडित, प्रा. रामदास वसगडे, प्रा. रवींद्र राहीगडे, प्रा. नीतिन शिऊरकर, आर्कि. श्रुती दुधाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव प्रा. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले, उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या सहकार्यामुळे ही परिषद यशस्वी झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.