महाराष्ट्रावर मोठं संकट… राज ठाकरेंनी दिल्या सूचना

या संकटाला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.

123

राज्यात मागील दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये तर दरड कोसळण्याच्या दोन घटनांमध्ये ३६ जणांचे प्राण गेले आहेत. याचमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. महाराष्ट्रावरचे हे मोठे संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असा संदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांसाठी दिला आहे.

(हेही वाचाः कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३६ जणांचा मृत्यू)

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन हा संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीमध्ये मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल, तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः डोंगर उतारावरील लोकांचे स्थलांतर करावे, महाड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता)

तातडीने मदत करा

आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पाहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी, असा संदेश राज ठाकरेंनी या जाहीर पत्रात दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.