खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) वर मकोका अंतर्गत कारवाई करताच परळीत त्याच्या समर्थकांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. त्याच्या समर्थकांनी परळी बंद करायला सुरुवात केली. एसटी महामंडळाने परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द केल्या आहेत. या समर्थकांनी परळी- कौडगाव कानडी या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बीड मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही वेळापूर्वीच बस सुरू केल्या होत्या. परंतु परळी बंद व अनेक ठिकाणी होणारे रस्ता रोको आदीच्या वृत्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांनी परळी आगारातून बस सेवा बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने परळीतून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या आईने सकाळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडा समर्थक पोलिस ठाण्यासमोर जमा झाले. परळी शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी याच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाली. त्यानंतर प्रचंड घोषणाबाजी व आक्रमक पवित्रा घेत आत्मदहनाचाही प्रयत्न काही समर्थकांनी केला. परळी तालुक्यात काही ठिकाणी रस्ता रोकोचाही प्रकार समोर आला. त्यानंतर एसटी महामंडळाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटनाही पुढे आली आहे. दरम्यान आता परळी आगारातून सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community