- खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक झाली, राज्यात विधानसभा निवडणुकही पार पडली, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षही निवडला गेला. आता महापालिका निवडणूक जवळ आली आणि मुंबई भाजपाच्या अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली. जवळपास चार-पाच आमदार मुंबई अध्यक्ष पदासाठी स्पर्धेत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. (State BJP)
दोन्ही अध्यक्ष मंत्रिमंडळात
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपामध्ये काही संघटनात्मक बदल सुरू झाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे ‘एक व्यक्ति एक पद’ या सूत्रांनुसार बावनकुळे यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांची निवड झाली. (Mumbai BJP)
(हेही वाचा – Dhananjay Munde पंतप्रधान मोदींच्या बैठकीपासून दूर; परळीत पाठवलं ? राजकीय चर्चांना उधाण)
पालिका निवडणुका तोंडावर
आगामी काळात मुंबईसह राज्यभरातील अनेक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असून, त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अध्यक्षपदासाठी तरुण सर्वमान्य आणि राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्व असणे आवश्यक आहे. मुंबई अध्यक्ष कोणीही झाला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रभावाखालील असेल, असे बोलले जात आहे. (State BJP)
अळवणी, साटम, भातखळकर, दरेकर?
मुंबई अध्यक्ष पदासाठी काही दिवसांपूर्वी माजी आमदार सुनील राणे यांचे नाव चर्चेत होते, मात्र सध्या ते मागे पडले असून आता अतुल भातखळकर, अमित साटम, पराग आळवणी आणि विधान परिषद आमदार प्रविण दरेकर या आमदारांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर काही काळ मनोज कोटक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती, पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती, उत्तर भारतीय, अमराठी अध्यक्ष निवडीचा पर्याय पक्ष स्वीकारणार नाही, अशी शक्यता अधिक आहे. (Mumbai BJP)
(हेही वाचा – Rahul Gandhi अपरिपक्व विरोधी नेता; BJP ची प्रखर शब्दात टीका)
दोघे आघाडीवर
त्यामुळे मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी आमदार साटम आणि दरेकर यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. ४८ वर्षीय माजी नगरसेवक आणि सलग तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेले अमित साटम यांना मुंबईची आणि विशेषतः महापालिका क्षेत्राची चांगली माहिती असून महापालिकेतील त्यांच्या अनुभवाचा निवडणुकीत पक्षाला उपयोगच होईल, अशी माहिती भाजपाच्या अंतर्गत सूत्रांकडून देण्यात आली. तर दरेकर यांनी अनेक वर्षे विद्यार्थी सेनेत काम केल्याने मुंबईत काम करत असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असाही विचार पक्ष पातळीवर सुरू आहे. (State BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community