- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या त्याच्या घरीच सक्तीच्या विश्रांतीवर असून त्याला अंथरुणावरूनही न उठण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच्या पाठीचे दुखावलेले स्नायू बरे होऊन सूज उतरेपर्यंत तो अंथरुणाला खिळलेला असणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात तो बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत जाऊ शकतो. पण, तो तिथे नक्की कधी जाणार हे अजून ठरलेलं नाही. गेल्या आठवड्यात बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाहून परतला आहे. त्याच्या पाठीची सूज कायम आहे. त्यामुळे हे चिन्ह नक्कीच चांगलं नाही.
‘सध्या बुमराह (Jasprit Bumrah) त्याच्या घरीच आहे. त्या अंथरुणावरून उठायलाही बंदी घालण्यात आली आहे. सूज उतरली की, तो बंगळुरूला जाईल आणि तिथे त्याच्या सर्व तपासण्या केल्या जातील. त्याच्या पाठीच्या दुखण्यांचा इतिहास पाहिला तर त्याला मैदानात उतरवण्याची घाई केली जाणार नाही,’ असं सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
(हेही वाचा – राज्यातील ITI महाविद्यालयांना मिळणार महापुरुषांची नावे)
स्नायूला आलेली सूज हे चांगलं लक्षण नाही, असं भारतीय संघाचे माजी फीजिओ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे. ‘सूज नेमकी कशामुळे आली आहे, हे आधी समजून घ्यावं लागेल. त्यानंतर बुमराहच्या दुखापतीचा अंदाज देता येऊ शकेल. पण, शक्यतो स्नायूमध्ये छोटीशी चिर गेल्यामुळे सूज येते. सूज स्नायूंला आली आहे की, मणक्याला तेही पाहावं लागेल. त्यानुसार, दुखापत बरी होण्याचा कालावधी ठरेल. मणक्याला मार लागला असेल तर वेळ लागू शकतो,’ असं श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे.
भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम व्यस्त आहे. चॅम्पियन्स करंडकानंतर आयपीएल (IPL) आणि त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बुमराहने लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावं अशीच संघाची इच्छा असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community