- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघाला नवीन फलंदाजीचा प्रशिक्षक मिळू शकतो. संघाचा प्रशिक्षकांचा ताफा त्यामुळे विस्तारणार आहे. मायदेशातील न्यूझीलंड विरुद्धची मालिका आणि त्या मागोमाग ऑस्ट्रेलियात झालेला पराभव या दोन्हीमध्ये फलंदाजांचं अपयश उठून दिसलं होतं. शिवाय फलंदाज वारंवार चुकीचे फटके खेळून बाद होतानाही दिसले. त्यानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जी चर्चा झाली त्यावरून असं दिसतंय की, फलंदाजीच्या प्रशिक्षकाची नियुक्ती येत्या दिवसांमध्ये होऊ शकते. इतकंच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमधील काही नावांची चर्चाही समोर येत आहे. क्रिकबझने ही बातमी दिली आहे. यावेळी प्रशिक्षक भारतीय असेल हे नक्की आहे. सध्या गौतम गंभीरच्या ताफ्यात गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून मॉर्नी मॉर्केल आणि रायन टेन ड्युसकाटे तसंच अभिषेक नायर हे तीन प्रशिक्षक आहेत. पण, यातील अभिषेक आणि ड्युसकाटे हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांची नेमकी भूमिका गुलदस्त्यातच आहे. (India Coaching Staff)
(हेही वाचा – Vande Bharat Sleeper ट्रेनची ट्रायल रन यशस्वी)
ऑस्ट्रेलियात विराट आणि रोहित सारखे ज्येष्ठ खेळाडूही वारंवार एकसारखा फटका खेळताना बाद झाले. त्यामुळे ही चर्चा झाल्याचं समजतंय. अर्थात, बीसीसीआयचा यावर अजून निर्णय झालेला नाही. तर खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या तपासणीसाठी यो-यो चाचणीही परतणार आहे. विराट कोहली कर्णधार असताना ही चाचणी त्याने संघात लोकप्रिय केली होती. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक आणि विराट कर्णधार असताना असा नियम होता की, ही चाचणी उत्तीर्ण करणाऱ्या खेळाडूंनाच संघात स्थान मिळत होतं. पण, खेळाडूंचा कार्यक्रम आणखी व्यस्त झाल्यानंतर ही चाचणी बंद करण्यात आली. पण, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यामुळे आता यो-यो चाचणी परतणार असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. (India Coaching Staff)
(हेही वाचा – Paris Olympic Defective Medals : पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीवर खराब पदकं बदलून देण्याची नामुष्की)
यो-यो चाचणी ही डॅनिस फुटबॉल फीजिओ जेन्स बांग्सबो यांनी १९९० च्या दशकात आणली होती. यात खेळाडूंची चपळता, वेग आणि दमछाक झाल्यावर शरीराला पूर्ववत होण्यासाठी लागणारा कस मोजला जातो. २० मीटरच्या अंतरावर दोन खुणा केलेल्या असतात. एकावेळी खेळाडूला हे २० मीटरचंच अंतर धावायचं असतं. पण, एकूण चाचणी सुरू असताना खेळाडू २ किलोमीटर धावतो. प्रत्येक २० मीटरच्या फेरीनंतर खेळाडूला ६ सेकंदांचा वेळ मिळतो आणि प्रत्येक फेरीच्या वेळी ते कापण्यासाठी खेळाडूला दिला जाणारा वेळ कमी होत जातो. खेळाडू निर्धारित वेळेत प्रत्येक फेरी पूर्ण करू शकला तर तो तंदुरुस्त असल्याचं जाहीर करण्यात येतं. भारतीय संघात विराट कोहलीचा योयो स्कोअर सर्वाधिक म्हणजे १९.२ इतका होता. उत्तरोत्तर ही चाचणी खूप कठीण होत जाते. (India Coaching Staff)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community