- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याला सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची बातमी फेटाळून लावली आहे. बुमराह अहमदाबादला घरीच असून त्याला अगदी अंथरुणावरूनही न उठण्याचा वैद्यकीय सल्ला दिल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली होती. पण, बुमराहने स्वत: एका ट्विटमधून ‘खोट्या बातम्यांवर’ विश्वास ठेवू नका, असं म्हटलं आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि तोपर्यंत बुमराह तंदुरुस्त होईल का, यावर उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहे.
अशावेळी बुमराहने (Jasprit Bumrah) केलेलं ट्विटही अर्धवटच आहे. ‘मला ठाऊक आहे, खोटी बातमी झटकन सगळीकडे पसरते. पण, या बातमीचं मलाही हसू आलं,’ असं बुमराह या ट्विटमध्ये म्हणतो. पण, त्याला नेमकं काय झालंय हे त्याने अर्थातच सांगितलेलं नाही.
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभमुळे विमान प्रवास महागला ; मुंबई- प्रयागराज विमानाचे तिकीट दर जाणुन घ्या …)
I know fake news is easy to spread but this made me laugh 😂. Sources unreliable 😂 https://t.co/nEizLdES2h
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) January 15, 2025
जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियातील पाचव्या सिडनी कसोटीत पाठदुखीचा त्रास सुरू झाला. पहिल्या डावांत त्याने फलंदाजी करत २२ धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत १० षटकं टाकून त्याने ३३ धावांत दोन बळी घेतले होते. पण, त्यानंतर त्याच्या पाठीत उसण भरल्याचं सांगितलं गेलं. तो फिजीओबरोबर रुग्णालयात स्कॅनसाठीही जाऊन आला. भारताच्या दुसऱ्या डावांत त्याने फलंदाजी केली आणि तो शून्यावर बाद झाला. पण, गोलंदाजीला तो आला नाही. त्याच्या पाठीचा स्नायू दुखावलाय आणि त्याला सूज आलीय, एवढीच माहिती सध्या आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने एकूण १५१ षटकं टाकली. पण, त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथ न मिळाल्यामुळे बुमराहवर (Jasprit Bumrah) गोलंदाजीचा अतिरिक्त बार पडला. मेलबर्न कसोटीत तर त्याने ९ वेगवेगळे स्पेल टाकले. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहने पर्थ आणि सिडनी कसोटीत भारताचं नेतृत्वही केलं. शिवाय डिसेंबर महिन्यात तो आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. बोर्डर-गावस्कर मालिकेत त्याने ५ कसोटींत ३२ बळी मिळवले आणि मालिकावीराचा किताबही पटकावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community