- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कलेची, नाटकाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) तर्फे ‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सहा शाळांचा समावेश आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आतापासूनच रंगमंचाची ओळख होणार असून या फेस्टिव्हलमध्ये या १६ शाळांसह मुंबईतील महाविद्यालये, सेवाभावी संस्थाही सहभागी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये यूके येथील नॅशनल थिएटरदेखील सहभागी झाले आहे. (BMC School)
नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) तर्फे नाट्यसृष्टीशी निगडित विविध महोत्सव, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘एनसीपीए’मध्ये १६ जानेवारी २०२५ पासून १९ जानेवारी २०२५ तसेच २३ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच सेवाभावी विविध संस्था, पाच खासगी शाळांबरोबरच महानगरपालिकेच्या सहा शाळांचे विद्यार्थी कलागुण सादर करणार आहेत. (BMC School)
(हेही वाचा – दिल्ली विधानसभेसाठी Ajit Pawar यांच्याकडून राष्ट्रवादीच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर)
या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी १६ जानेवारी २०२५ रोजी महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील गोविंदनगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बॅक इन द डे’ का कार्यक्रम सादर केला. तसेच शनिवार १८ जानेवारी २०२५ रोजी के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेचे विद्यार्थी ‘पूरवैय्या’, १९ जानेवारी रोजी एफ दक्षिण विभागातील अभ्युदय नगर मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘सुपरग्ल्यू’, २३ जानेवारी रोजी जी दक्षिण विभागातील सीताराम मील कंपाऊंड मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एपिक’, २४ जानेवारी रोजी पी उत्तर विभागातील चिंचवली मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘रिमोट’ आणि दिनांक २६ जानेवारी रोजी एच पूर्व विभागातील खेरवाडी मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एज इज रिव्होल्टिंग’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. (BMC School)
या नाटकांतून सुख-दु:खाच्या रंगछटांसह यश आणि वातावरण बदल आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नाटकांचे दिग्दर्शन कसे करावे, नेपथ्याची मांडणी, कलागुणांना वाव देणे, सांघिक प्रयत्न आणि उत्तम सादरीकरण आदी विषय विद्यार्थ्यांना या फेस्टिव्हलमध्ये शिकायला मिळणार आहेत. तसेच ही नाटकं पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ५० विद्यार्थ्यांना दररोज विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. साहजिकच नाटकांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना नाटक कसे घडते, याची माहिती आणि प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. (BMC School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community