Rahul Gandhi आणि शरद पवार यांच्यात वैचारिक मतभेद!

51
Rahul Gandhi आणि शरद पवार यांच्यात वैचारिक मतभेद!
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्तुती करून चार दिवस होत नाही तोच कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संघावर निशाणा साधला. या पूर्वीही शरद पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेत राहुल गांधी यांनी पवार आणि कॉंग्रेसचे वैचारिक मतभेद असल्याचे दाखवून दिले आहे.

संघाचे केडर मजबूत, वचनबद्ध

मुंबईतील पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी ‘आरएसएस’ची स्तुती केली. विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. संघ स्वयंसेवकांनी त्यांच्या विचारसरणीवर निष्ठा व वचनबद्धता दाखवून काम केलं. आपणही राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला अनुसरून एक मजबूत व वचनबद्ध केडर तयार करण्यासाठी काम केलं पाहिजे, असे पवार म्हणाले.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : सक्तीच्या विश्रांतीच्या बातमीला बुमराह म्हणाला, ‘फेक न्यूज’)

लढाई भाजपा आणि आरएसएसविरुद्ध

पवार यांनी १० जानेवारी २०२५ या दिवशी संघाची स्तुती केली आणि त्यानंतर चार दिवसांतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून टीका केली आहे. भारताला खरे स्वातंत्र्य १९४७ मध्ये नाही तर अयोध्येत राम मंदिराची उभारणीनंतर मिळाले, अशा आशयाचे विधान भागवत यांनी केले होते. यावरून राहुल गांधी यांनी कडाडून टीका भागवत यांचे हे विधान म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असे मत व्यक्त केले. आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत, असे समजू नका. ही लढाई भाजप आणि आरएसएसविरुद्धची आहे, असेही गांधी म्हणाले.

अदानीविरुद्ध मोहीम

उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना भंडारा आणि गोंदिया या भागात त्यांचे प्रकल्प सुरू झाले आणि त्याचे उद्घाटन आपणच केले, असेही पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी यांच्याविरुद्ध जणू मोहिमच उघडली आहे.

(हेही वाचा – Saif Ali Khan : गुन्हेगारीला धर्माशी जोडणे हे गैर आहे; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मतभेद

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मार्च २०२३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली, तेव्हाही शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचं महत्त्व समजावून सांगितलं. सावरकरांचं विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेता त्यांना ‘माफीवीर’ संबोधणं योग्य नसल्याचं पवार यांनी गांधी यांना सांगितलं. तसेच आपण सावकरकांवरील टीका टाळायला हवी, असं पवार राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. ज्यावर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही सहमती दर्शवली होती. असे काही अपरिपक्व विचार व्यक्त केल्याने काँग्रेसचे अनेकदा नुकसान झाले असले तरी राहुल गांधी यांच्यात फारशी सुधारणा होत नसल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.