BCCI Code of Conduct : बीसीसीआयची खेळाडूंसाठी १० कलमी आचारसंहिता

BCCI Code of Conduct : ऑस्ट्रेलियातील अपयशानंतर बीसीसीआयने खेळाडूंवर काही निर्बंध लादले आहेत.

66
BCCI Code of Conduct : बीसीसीआयची खेळाडूंसाठी १० कलमी आचारसंहिता
  • ऋजुता लुकतुके

मागचे काही दिवस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील अपयशानंतर बीसीसीआयमध्ये झालेल्या आढावा बैठकीची चर्चा सुरू होती. त्यातील तपशीलही टप्प्या टप्प्याने बाहेर येत होते. आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी तयार केलेली आचारसंहिताच समोर आली आहे. यात दहा कलमं आहेत आणि सर्वच खेळाडूंसाठी या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. संघातील निवडीचे नियम ते दौऱ्यावर कशी वागणूक असायला हवी अशा सगळ्या गोष्टी यात अंतर्भूत आहेत. (BCCI Code of Conduct)

(हेही वाचा- Accident News : पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ९ जणांचा मृत्यू)

संघ हिताला प्राधान्य आणि तंदुरुस्तीला महत्त्व देणारी ही कलमं आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही खेळाडू आपल्या खाजगी व्यवस्थापकाला बरोबर घेऊन गेले होते. तर काही खेळाडू आपल्या कुटुंबींयांबरोबर स्वतंत्र प्रवास करत होते, ते संघासाठी ठेवलेल्या बसमधून स्टेडिअमला जात नव्हते. अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या सगळ्याची दखल बीसीसीआयने घेतली आहे आणि त्यानंतर ही दहा कलमी आचारसंहिता तयार झाली आहे. (BCCI Code of Conduct)

हे १० नियम पाहूया, 

१. सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक असेल. संघ निवडीसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा निकष असेल. अगदीच अपवादात्मक प्रसंगी वैद्यकीय चमूच्या परवानगीनंतर खेळाडूंना देशांतर्गत सामन्यातून सूट मिळेल. 

२. खेळाडूंचे कुटुंबीय बरोबर असले तरी खेळाडूने स्टेडिअम आणि सरावाच्या ठिकाणी जाताना तसंच तिथून हॉटेलमध्ये जाताना संघाच्या बसमधून एकत्र प्रवास करावा. कुटुंबासाठी वेगळी व्यवस्था बीसीसीआयकडून केली जाणार नाही. 

३. दौऱ्यावर बीसीसीआयने पूर्वी परवानगी दिलेल्या वजनाचंच सामान खेळाडूंना बरोबर ठेवता येईल. अतिरिक्त सामानाचा खर्च खेळाडूंना स्वत:ला उचलावा लागेल. दोन किट बॅग सह तीन बॅगांना परवानगी असेल. 

४. तुमच्याबरोबर खाजगी व्यवस्थापक, खानसामा, खाजगी फिटनेस तज्ज दौऱ्यावर येणार असतील तर त्यांचा खर्च खेळाडूला उचलावा लागेल. त्यांना खेळाडूंबरोबर अधिकृत ठिकाणी राहता येणार नाही. 

५. आपल्या तंदुरुस्तीसाठी काही साधनं विकत घेतल्यास आणि ती बंगळुरूला क्रिकेट अकादमीत पाठवायची असल्यास त्याच्या खर्चाची परवानगी आधी बीसीसीआयकडून घेणं बंधनकारक आहे. 

६. खेळाडूंना सराव सत्र अर्धवट सोडता येणार नाही. किंवा सरावात उशिरा करता येणार नाही. इतर खेळाडूंबरोबर सरावाच्या ठिकाणी पोहोचणं आणि तिथून एकत्र निघणं बंधनकारक असेल. 

७. दौऱ्यावर असताना खाजगी जाहिरातींचं चित्रिकरण करता येणार नाही. किंवा पूर्वपरवानगीशिवाय खाजगी कार्यक्रमालाही जाता येणार नाही. 

८. खेळाडू ४५ दिवसांपेक्षा जास्त मोठ्या दौऱ्यावर भारताबाहेर जाणार असतील तर एकूण दौऱ्यात एकाच वेळी कुठलेही १५ दिवस खेळाडू आपल्या कुटुंबीयांना बरोबर ठेवू शकतो. पत्नी व १८ वर्षांखालील मुलं खेळाडूबरोबर हॉटेलमध्ये राहू शकतात. दौरा ३० दिवसांचा असेल तर कुटुंबं १ आठवडा खेळाडूबरोबर राहू शकतं. अशा परिस्थितीत कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्थाही बीसीसीआयकडून करण्यात येईल. पण, कुटुंबीयांचे इतर खर्च खेळाडूने करायचे आहेत. 

९. बीसीसीआयने आयोजित केलेली फोटोशूट, अधिकृत कार्यक्रम यांना खेळाडूची उपस्थिती अनिवार्य असेल. 

१०. मालिका किंवा स्पर्धा ठरल्यापेक्षा आधी संपली तरी बीसीसीआय व्यवस्था करेपर्यंत आणि पूर्वनिर्धारित वेळेपर्यंत खेळाडूंना ते ठिकाण सोडता येणार नाही. 

(हेही वाचा- MLA Sangram Jagtap यांनी हटवले सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण)

खेळाडूंनी या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल आणि त्यात कसूर झाल्यास खेळाडूंचा दौरा, स्पर्धा किंवा अगदी आयपीएलमधील सहभागही बीसीसीआयला रद्द करता येईल. तसंच चुकीचं मूल्यमापन करून सामन्यासाठी बीसीसीआय देत असलेल्या मोबदल्यातून दंड वसूल करण्याचा अधिकारही बीसीसीआयला असेल.  (BCCI Code of Conduct)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.