Dental College : शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

58
Dental College : शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय
Dental College : शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

वृद्ध रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या (Dental College) तळमजल्यावर ‘जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट’ची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष युनिटचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर (Rajeev Nivatkar) यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड – पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आयुक्त राजीव निवतकर (Rajeev Nivatkar) म्हणाले, “रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य निर्माण करणे, तसेच मौखिक आरोग्य क्षेत्रात कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा केला जातो. अशा उपक्रमांमुळे दंतचिकित्सेच्या क्षेत्रात वृद्ध रुग्णांना अत्याधुनिक सेवा देणे शक्य होईल.”

(हेही वाचा – UBT च्या संभाजीनगरमधील ३५ स्थानिक नेत्यांनी दिले सामूहिक राजीनामे)

विद्यार्थ्यांचा सहभाग व विविध उपक्रम

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धा, क्रॉसवर्ड कोडे, सर्जनशीलता आणि स्लोगन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि कौशल्य प्रदर्शित केले. यामध्ये दंतचिकित्सेमधील कृत्रिम दंतशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष माहितीपत्रक

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे रुग्ण जागरूकतेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध उपचारांबद्दलच्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. ही माहितीपत्रके ज्येष्ठ नागरिकांना वाटण्यात आली, जेणेकरून त्यांना उपलब्ध सेवांविषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. (Dental College)

या उपक्रमामुळे वृद्ध रुग्णांना एकाच ठिकाणी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक दंतचिकित्सा सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा योजनांमुळे मौखिक आरोग्य सुधारण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.