- सुजित महामुलकर
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला किमान २९ जागा मिळू शकल्या नसल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी विरोधी पक्षांमधील एकही पक्ष पात्र नाही. तरीही शिवसेना उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते पद कुणालाही देऊ नये, अशी भूमिका भाजपाची (BJP) असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
अधिकार सत्ताधारी भाजपाकडे
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले तर महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. ‘मविआ’मध्ये उबाठाचे २० तर काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे १० उमेदवार निवडून आले. विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधी पक्षातील किमान एका पक्षाचे १० टक्के उमेदवार म्हणजेच एकूण २८८ जागांपैकी २९ उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. मात्र ‘मविआ’मधील एकाही पक्षाला २९ उमेदवार निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद द्यायचे की नाही हे ठरविण्याचा अधिकार सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष भाजपाकडे (BJP) आला.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : ७० जागांवर ६९९ उमेदवार नशीब आजमावणार)
लोकसभेत १० वर्षे विरोधी नेता नाही
लोकसभेतही २०१४ नंतर २०२४ पर्यंत एकाही विरोधी पक्षाला १० टक्के उमेदवार निवडून आणता न आल्याने कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले नाही. त्याच धर्तीवर राज्यातील भाजपा (BJP) निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगण्यात आले. लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने फारसा काही फरक पडला नाही तर राज्यात विरोधी पक्षनेता नसेल तर काय फरक पडणार? असा प्रश्न एका सत्ताधारी आमदारने केला.
उबाठाचे प्रयत्न व्यर्थ
त्यामुळे गेले काही दिवस शिवसेना उबाठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, शरद पवार यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, ते सगळे प्रयत्न व्यर्थ जाण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेना उबाठाची आमदार संख्या (२०) काँग्रेसपेक्षा (१६) तुलनेने अधिक असल्याने विरोधी पक्ष नेते पदावर त्यांनी दावा केला असून काँग्रेसनेही विरोधी पक्ष नेते पद आपल्याला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. उबाठाकडे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद असल्याने विधानसभेत काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. “येत्या दोन-दीन दिवसांत याबाबत निर्णय होईल,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी २१ जानेवारी २०२५ या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community