कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली असून, महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, विस्कटलेली ही घडी बसायला बराच वेळ जाणार आहे. कोकणात आलेल्या संकटामुळे अनेक राजकीय नेते सध्या कोकणात असून, विविध माध्यमातून आता मदत देखील पोहोचवली जात आहे. आता पुराचं पाणी जरी ओसरले असले तरी अद्याप संकट कायम आहे. या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील नेते व मंत्री कोकणच्या दौऱ्यावर जाऊन आले. मात्र या सर्वात कोकणचे ‘ते’ नेते कुठे आहेत, असा प्रश्न मात्र कोकणी जनतेला नक्कीच पडला असेल. एकीकडे कोकणी जनता पुरात असताना कोकणातील काही नेते मात्र घरातच होते की काय, असा प्रश्न आता कोकणी जनतेला पडला आहे. नेमके कोणते नेते घरात होते त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
सुरेश प्रभूंचे दर्शन झाले नाही!
सुरेश प्रभू…कोकणातील असे नाव ज्यांना मोदी सरकारने रेल्वे मंत्री पद दिले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले सुरेश प्रभू मतदारसंघात फारसे सक्रिय नसतात. कोकणात पूर परिस्थिती असताना देखील सुरेश प्रभू कुठेच दिसले नाहीत. एकीकडे भाजपचे राज्यातील इतर नेते कोकणात असताना कोकणातील हा नेता मात्र गायब होता. त्यामुळे संकट काळात कोकणी जनतेला प्रभू यांचे दर्शनच झाले नसल्याचे पहायला मिळाले.
(हेही वाचा : आमदार बनल्यावरही ‘ते’ नगरसेवकपदाचे मानधन घेतात!)
अनंत गीते आहेत गायब!
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री अशी ओळख असलेले अनंत गीते हे देखील मागील चार दिवसांत कुठेच दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला आणि गीते जणू राजकीय विजनवासात गेले. पराभव झाल्यापासूनच कोकणाकडे पाठ फिरवलेल्या अनंत गीते यांनी पुरात देखील कोकणाकडे पाहायची तसदी घेतली नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणी दौऱ्यावर असताना देखील गीते मात्र तेव्हाही दिसले नाहीत.
रवींद्र वायकर मुंबईतच राहिले!
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले रवींद्र वायकर यांना देखील कोकणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. एकीकडे भाजपचे राज्यातील नेते कोकणात दौरे करत असताना पालकमंत्री राहिलेल्या रवींद्र वायकर यांनी तौक्तेच्या वेळीही कोकणाकडे पाठ फिरवली आणि आता पुरात कोकण असताना देखील ते मुंबईत राहिले.
(हेही वाचा : १०० वर्षांत पहिल्यांदाच पडला इतका पाऊस! अजित पवारांनी महापुरामागील सांगितले कारण)
Join Our WhatsApp Community