Ministry समोर नाशिकच्या तरुणाचे आंदोलन; प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आक्रोश

49
Ministry समोर नाशिकच्या तरुणाचे आंदोलन; प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आक्रोश
  • प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गिरणानगर येथील सुनील तुकाराम सोनवणे या तरुणाने शुक्रवारी मंत्रालयाच्या (Ministry) प्रवेशद्वाराबाहेर झाडावर चढून सरकारचे लक्ष वेधत अनोखे आंदोलन केले. सुनीलने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली.

“स्थानिक पातळीवर दखल घेतली नाही”

सुनील सोनवणे यांनी यापूर्वी स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. “मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्या दखलपात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे मंत्रालयासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नव्हता,” असे सुनीलने सांगितले.

(हेही वाचा – 10 वर्ष कृषीमंत्री राहून काय केलं? त्याचा हिशोब द्या; मालेगावातून Amit Shah यांचा शरद पवारांना थेट सवाल)

मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची परीक्षा

दुपारी पावणे चारच्या सुमारास सुनीलने मंत्रालयाच्या (Ministry) मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या झाडावर चढून बॅनर फडकावले. या अनपेक्षित घटनेने मंत्रालयाच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. पोलिसांनी लगेच झाडाला चारही बाजूंनी घेरले. मात्र, सुनीलने झाडाच्या उंच फांदीवर चढून आपले आंदोलन सुरू ठेवले. त्याच्या उडी मारण्याच्या भीतीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

पोलिसांची समजूत आणि सुनीलचा विरोध

पोलिसांनी सुनीलला खाली उतरवण्यासाठी आश्वासनांची भाषा वापरली. “तुझ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू,” असे आश्वासन देत पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास बसत नसल्याचे सुनीलने स्पष्ट केले. अखेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करत त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले.

(हेही वाचा – Water Cut : मालाड लिबर्टी गार्डनजवळील जलबोगद्याला गळती; शुक्रवारी रात्रीपासूनच तातडीने कामाला सुरुवात)

सरकारविरोधात नाराजीचा सूर

सुनीलने झाडावरून खाली उतरल्यानंतर त्याचा बॅनर आणि निवेदन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मंत्रालय (Ministry) परिसरात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापूर्वी आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता आंदोलक झाडांवर चढून आपला विरोध व्यक्त करत असल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे.

भ्रष्टाचाराची चौकशी आणि सरकारकडून ठोस पावले अपेक्षित

सुनील सोनवणे यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुनीलचा आरोप कितपत खरा आहे, याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांना असा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.