- चेतन राजहंस
राज्यघटना म्हणजेच संविधानाविषयी (Constitution) सध्या सतत बोलले जात आहे. त्या आधारे हिंदूंना आणि हिंदू धर्मियांना सतत अपमानित केले जात आहे. राज्यघटनेमध्ये असे काय आहे, ज्यामुळे सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर शोधताना राज्यघटनात्मक शब्द म्हणजे काय? हे प्रथम समजून घेऊया. जो शब्द भारतीय राज्यघटनेत लिहिला गेला आहे, त्याला ‘राज्यघटनात्मक शब्द’ म्हणतात. या नियमानुसार पुढील शब्द राज्यघटनात्मक आहेत.
१. राज्यघटनेतील संज्ञांचे अर्थ
१ अ. ‘कास्ट’ (जात) : राज्यघटनेत ‘शेड्युल कास्ट’ (अनुसूचित जाती) हा शब्द आला आहे. त्यामुळे जात शब्दाला विरोध करणे, हा राज्यघटनेला विरोध आहे.
१ आ. हिंदू : अलीकडेच कर्नाटकच्या निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष सतिश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ अश्लील असून तो परकीय आहे’, असे विधान केले होते. खरे तर त्यांचे विधान अज्ञानवश आहे. सिंधू नदीपासून ‘हिंदू’ शब्द बनलेला आहे. पाणिनीय व्याकरणानुसार ‘स’चा ‘ह’ उच्चार होतो. जसे ‘सप्ताह’ शब्दाला ‘हफ्ताह’ म्हटले जाते. राज्यघटनेच्या (Constitution) भाषेत सांगायचे, तर ‘हिंदू’ हा शब्द राज्यघटनात्मक आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ‘२५ ब’ मध्ये हा शब्द आहे. त्यात ‘शीख, जैन, बौद्ध, लिंगायत हे हिंदू आहेत’, असे स्पष्टीकरणही दिले आहे.
१ इ. धर्म : हा शब्द राज्यघटनेत नाही. राज्यघटनाकर्त्यांनी धर्म या शब्दासाठी ‘रिलीजन’ (उपासनापंथ) हा शब्द वापरात आणला आहे. राज्यघटनाकर्त्यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलीजन’ या शब्दांना एकार्थी मानले, तरी ‘ऑक्सफोर्ड शब्दकोशा’ने हे दोन्ही शब्द वेगळे असल्याचे अर्थ देताना स्पष्ट केले आहे.
१ ई. सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) : हा शब्द म्हणजे १९व्या शतकातील ख्रिस्ती संकल्पना आहे. ‘हा शब्द राज्यघटनेत (Constitution) असू नये’, असे तत्कालीन काँग्रेसचे नेते नेहरू, वल्लभभाई पटेल आणि राज्यघटनाकार डॉ. आंबेडकर यांचे मत असल्याने हा शब्द २६ जानेवारी १९५० या दिवशी बनलेल्या राज्यघटनेचा भाग बनला नाही. थोडक्यात त्या वेळी ‘सेक्युलर’ हा एक अराज्यघटनात्मक शब्द होता. वर्ष १९७६ मध्ये ‘सेक्युलर’ शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये ४२व्या सुधारणेच्या अंतर्गत जोडण्यात आला. त्या वेळी आणीबाणी होती. विरोधी पक्षांचे खासदार कारावासात होते. त्या वेळी राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन समाजवादी आणि जनसंघवादी आणीबाणीला विरोध करत होते. ही काँग्रेसविरोधी युती तोडण्यासाठी, तसेच समाजवाद्यांना आणि जनसंघाची मतपेटी नसलेल्या अहिंदूंना चुचकारण्यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने ४२व्या सुधारणेच्या अंतर्गत राज्यघटनेत ‘समाजवादी’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द घुसडले. त्या वेळी ‘सेक्युलर’ शब्दाची व्याख्या करण्यात आली नाही. राज्यघटनेत (Constitution) एखादा शब्द घालताना त्या शब्दाची व्याख्या करणे किंवा व्याप्ती सांगणे आवश्यक असते; कारण त्यानुसार न्यायालये निवाडे देत असतात, विधीमंडळ कायदे बनवत असते आणि प्रशासन त्यासंबंधी कार्यवाही करत असते.
२. अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ !
‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ राज्यघटनेत परिभाषित नसल्याने लोकशाहीतील चारही स्तंभ मनाप्रमाणे त्याच्या व्याख्या (इंटरप्रिटेशन) करत आहेत आणि एक प्रकारे हिंदू धर्मियांनाच लक्ष्य करत आहेत.
३ अ. शासन : ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली ‘सच्चर आयोग’, ‘अल्पसंख्यांक आयोग’, तसेच ‘वक्फ ॲक्ट’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’सारखे हिंदुविरोधी कायदे बनवण्यात आले.
३ आ. प्रशासन (ॲडमिनिस्ट्रेशन) : दंगलींमध्ये अल्पसंख्यांकांनी दंगल घडवली, तरी ‘बॅलन्स’ करण्यासाठी हिंदू नेत्यांना अटक केली जाते. हा सार्वत्रिक प्रशासनीय अनुभव आहे. याविषयी मी विस्तारात जाणार नाही.
३ इ. माध्यमे : प्रसारमाध्यमे दंगलींमध्ये दंगेखोर अल्पसंख्यांकांचे नाव टाळून ‘एक समूह किंवा गट’ संबोधतातत.अल्पसंख्यांकांच्या विद्वेषी भाषणांविषयी चर्चा करत नाही. आतंकवाद्यांना पकडल्यानंतर ‘कार्यकर्त्यांना पकडले’, असे लिहितात आणि नेहमीच हिंदूंना दोषी ठरवतात.
३ ई. न्यायासन (ज्युडीशिअरी) : ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या व्याख्येविषयी न्यायपालिकेमध्ये प्रचंड गोंधळ आहे. केंद्र सरकारद्वारे संचालित विद्यालयांना ‘केंद्रीय विद्यालय’ म्हणतात. या केंद्रीय विद्यालयात प्रतिदिन ‘असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।।’ ही प्रार्थना म्हटली जाते.
वर्ष २०१८ मध्ये या प्रार्थनेच्या विरोधात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका झाली. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, ही प्रार्थना हिंदू भाषेत असून ती हिंदू श्रद्धेशी संबंधित आहे. त्यामुळे ती ‘सेक्युलॅरीझम’च्या विरोधात आहे. खरे तर यात कुठल्याही हिंदू देवतेची प्रार्थना नसल्याने सर्वाेच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळायला हवी होती; परंतु दुर्दैवाने ती दाखल करून घेतली, म्हणजे एक प्रकारे हे ‘नॅरेटिव्ह’ (कपोलकल्पित लिखाण) मान्य केले. (Constitution)
भाषा कधी ‘सेक्युलर’ असते का ? याचिकाकर्त्याने संस्कृतला हिंदू श्रद्धेशी संबंधित भाषा म्हटले आणि ती ‘सेक्युलॅरिझम’च्या विरोधात असल्याचे म्हटले. न्यायालयाने ही याचिका मान्य केली, म्हणजे तत्त्वतः मान्य केले की, संस्कृत भाषा बोलणे, हे ‘सेक्युलॅरिझम’च्या विरुद्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या देशात हिंदू श्रद्धेशी संबंधित प्रार्थना करणे, हे ‘सेक्युलॅरिझम’च्या विरोधात आहे, हे एक प्रकारे न्यायालयाने मान्य केले आहे. (Constitution)
(लेखक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहे.)
Join Our WhatsApp Community