-
सुजित महामुलकर
लोकसभेची टेस्ट क्रिकेट मॅच झाली, केंद्रात ही मॅच भाजपाने जिंकली असली, तरी राज्याचा विचार करता महाविकास आघाडीने त्यात बाजी मारली. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभेच्या ‘वन-डे’मध्ये महाविकास आघाडी गाफील राहिली आणि महायुतीने विजयाचा ‘कप’ आपल्याकडे खेचून घेतला. आता महापालिकांच्या २०-२० च्या सामन्याच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०-२० मॅच म्हणजेच मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीला काँग्रेससोबत सामोरे जाणार की स्वबळावर ही मॅच खेळणार, याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोडल्याचा आभास निर्माण केला असला, तरी ते स्वतः संभ्रमावस्थेत आहेत, हे लपून राहिलेले नाही. ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी काहीशी अवस्था शिवसेना उबाठाची झालेली दिसते. एकटे लढले, तर मतविभागणीमुळे नुकसान होणार, हे निश्चित मानले जात आहे, तर आघाडीत लढल्यास मुंबईतील २२७ पैकी किमान शंभर-सव्वाशे जागांवर पाणी सोडावे लागणार, हे ठरलेले. त्यामुळे मुंबई महापालिका हातून निसटत असल्याची भीती उबाठा समोर आहे. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Republic Day 2025 : भारतीय संविधानाचा पाया खरेच ‘सेक्युलर’ आहे का?)
शिवसेनेचा पहिला महापौर ५४ वर्षांपूर्वी
१९७१-७२ मध्ये मुंबईला शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपाने मिळाला. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने १९८५ पासून शिवसेनेने मुंबई महापालिका ताब्यात घेतली. पुढे १९८८-८९ पासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी युती केली आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास चार दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले, असे म्हणता येईल. २०२२ मध्ये शेवटच्या महापालिकेचा कार्यकाळ संपला, तेव्हापासून पालिकेवर प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त काम पाहत आहेत. (Uddhav Thackeray)
ठाकरेंनी नगरसेवक फोडले
२०१७ मध्ये शिवसेना-भाजपाने मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढली आणि ‘कांटे की टक्कर’ होत २२७ पैकी ८४ शिवसेना आणि भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले. तेव्हा राज्यात सेना-भाजपा युती होती आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्यावेळी मुख्यमंत्रीपदी होते. फडणवीस यांनी किंचित प्रयत्न केले असते तरी मुंबईत भाजपाचा पहिला महापौर बसू शकला असता. पण युतीधर्म आणि ठाकरे आडनावाबद्दलचा आदर, यामुळे फडणवीस यांनी कदाचित महापौरपदासाठी रस घेतला नसावा. ठाकरे यांनी मात्र असुरक्षिततेच्या भावनेतून राज ठाकरे यांच्या मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले आणि अन्य काही अपक्षांसह पालिकेतील पक्ष मजबूत केला. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Republic Day 2025 : धर्म, धर्मनिरपेक्षता आणि Constitution !)
त्यानंतर २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि गेल्या पाच वर्षातील उद्धव ठाकरे यांची बदललेली भूमिका यामुळे भाजपा आणि ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली. पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता फडणवीस राजकारणात तावून-सुलाखून ‘पुन्हा आले’. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका आता शेवटचा आशेचा किरण दिसत आहे आणि त्यासाठी ‘करो या मरो’ची लढाई सुरू झाली आहे. (Uddhav Thackeray)
काँग्रेस धक्क्यातच
महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला, तरी लवकरच त्यावर तोडगा निघून महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊनच शिवसेना उबाठा, शिवसेना (शिंदे), भाजपा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कामाला लागली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबईत फार रस असल्याचे दिसत नाही तर काँग्रेस अद्याप विधानसभेच्या धक्क्यातून बाहेर पडल्याचे चित्र दिसत नाही. शिवाय प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्याने काँग्रेस पक्ष अद्याप पालिका निवडणूक ‘मोड’मध्ये आल्याचे जाणवत नाही. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- लाडकी बहिण योजनेचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात; Aditi Tatkare यांची माहिती)
हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मुस्लिम मतदारांकडून
गुरुवार, २३ जानेवारी २०२५ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अंधेरी येथे शिवसेना उबाठाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करताना उदधव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्याचबरोबर ‘गद्दारांच्या वाराने मी संपणार नाही गद्दारांना गाडेन’ वगैरे सांगत पक्ष सोडून जाण्याच्या वाटेवर असणाऱ्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. लोकसभेला मुस्लिम मतांवर प्रचंड यश मिळाल्यानंतर विधान सभेला हिंदुत्व सोडल्याचा मोठा फटका बसला आणि जाग आली. हिंदू मते दूर जात आहेत, हे लक्षात येताच ठाकरे हिंदुत्वाकडे वळले आणि त्यांनी आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणातील जवळपास १०-१२ मिनिटे आपण हिंदुत्व कसे सोडले नाही आणि आपलेच हिंदुत्व कसे खरे, याचे स्पष्टीकरण देण्यात खर्ची घातले. इतकेच काय, तर मुस्लिम मतदारांनीही त्यांना हिंदुत्व सोडले नसल्याचे प्रमाणपत्र दिले, असे ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले. (Uddhav Thackeray)
.. आणि वेळ मारून नेली
आता मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी स्वतंत्र लढावे की काँग्रेससोबत आघाडीत रहावे हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यातूनच कोणतीही ठोस घोषणा न करता ठाकरे यांनी निर्णय कार्यकर्त्यांवर सोडला. “मला तुमची जिद्द बघू द्या, तयारी बघू द्या, ज्या भ्रमात आपण राहिलो, त्या भ्रमातून बाहेर या. ज्या क्षणी आपली खात्री पटेल की, आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही,” असे सांगून वेळ मारून नेली. दुसरीकडे मुंबईत महायुती ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाणार हे जवळपास ठरले आहे. या सत्ताधारी बलाढ्य महायुतीसमोर लढायचे कसे? अशा द्विधा मनःस्थितीत उबाठा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या परिस्थितीत स्वतंत्र लढणे म्हणजे काँग्रेस आणि उबाठातील मतविभागणीला आमंत्रण देणे ठरेल. आघाडी केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) या मित्रपक्षांसाठी किमान १००-१२५ जागा सोडाव्या लागतील आणि निवडून येणाऱ्यांची संख्या कमी होईल. या कात्रीत सापडलेल्या उबाठासमोर महापालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असेल, यात शंका नाही. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community