राज्यातील पूरपरिस्थितीचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोल्हापूर, सांगली सोबतच पुण्यातही अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनी आणि पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजन देशमुख यांनी नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंटनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
शेती आणि शेतजमिनींचे नुकसान
पुण्यातील घाटमाथा प्रदेशाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, भार, वेल्हे, मावळ, मुळशी या क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे मावळ तालुक्यातील तांदळाची शेती उद्ध्वस्त झाली आहे. तसेच जमिनीचा पोतही बिघडला आहे. नोंदवण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार एकूण साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आणि शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानाची खरी माहिती मिळू शकेल.
तात्काळ मदत जाहीर
राज्यातील साधारण 9 पूरग्रस्त जिल्ह्यांमधील स्थिती ही विदारक आहे. तळ कोकणातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात आली असून, अन्नधान्य खरेदासाठी 5 हजार आणि ज्या घरांत आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे, त्या घरांना 10 हजार रुपयांची तात्काळ मदत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे.
Join Our WhatsApp Community