पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी, भाजपची मदत थोडी, प्रसिद्धी मात्र मोठी!

पूरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादीने अवघे ३९ लाख रुपये, तर भाजपने २० लाख ७५ हजार रुपयांची घोषणा केली आहे.

135

नैसर्गिक आपत्ती आल्यावर मदतीच्या नावाखाली राजकीय श्रेयवादाची अक्षरशः चढाओढ सुरु होते. त्यासाठी कोण आधी मदतीची घोषणा करतो याची स्पर्धा सुरु होते, असाच अनुभव राज्यात पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्यावरून आला आहे. या स्पर्धेत यंदा भाजप आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. पूरग्रस्तांना मदत जाहीर करताना राष्ट्रवादीने ३९ लाख रुपये तर भाजपने २० लाख ७५ हजार रुपयांची घोषणा केली आहे. मुसळधार पावसाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांचे जेवढे नुकसान झाले, त्या तुलनेत या राजकीय पक्षांनी जेवढी मदत जाहीर केली, ती तुटपुंजी आहे.

पाहणी दौऱ्याची चढाओढ! 

राज्यात १९ जुलैपासून मुसळधार पाऊस झाला, सलग पाच दिवस प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील चिपळूण आणि महाड हे दोन तालुके पाण्याखाली गेले. तर दुसरीकडे सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे तीनही जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले. राज्यात ७ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामध्ये ७० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला. कारण बचाव पथके दोन दिवस घटनास्थळी पोहचल्या नव्हत्या. पूर ओसरल्यानंतर मात्र पाहणी दौऱ्याची चढाओढ सुरु झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणी दौऱ्यावर गेले, त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दौरा केला, आमदार भास्कर जाधव यांनी दौरा केला. अशा रीतीने अक्षरशः उठसुठ पाहणी दौरे करण्याची स्पर्धा लागली.

(हेही वाचा : भास्करराव आजवर किती वेळा चुकले? वाचा…)

मदतीच्या घोषणेचीही स्पर्धा! 

त्याबरोबर लागलीच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. त्यामध्ये महाराष्ट्र भाजपने मुंबई महापालिकेतील ८३ नगरसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार अशी घोषणा केली. नगरसेवकांना प्रतिमहिना २५ हजार रुपये मानधन मिळते, ते पाहता भाजपची ही मदत अवघी २० लाख ७५ हजार रुपये इतकी असणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पक्षाचे ५४ आमदार, ५ खासदार हे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार अशी घोषणा केली. आमदाराचे ६७ हजार रुपये तर खासदाराचे ७० हजार रुपये मानधन लक्षात घेऊन ही रक्कम ३९ लाख ६८ हजार होते. अशा प्रकारे पूरग्रस्त भागासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने लोकप्रतिनिधींचे एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याची घोषणा करून गाजावाजा केला. वस्तुतः पूरग्रस्तांचे झालेले नुकसान पाहता भाजप आणि राष्ट्रवादी यांनी केलेली मदतीची घोषणा ही तुटपुंजी आहे. या व्यतिरिक्त मनसे, भाजप यांनी पूरग्रस्त भागाला जीवनाश्यक वस्तू भरून ट्रक पाठवले. त्यावरही सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.