-
ऋजुता लुकतुके
आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस यांनी बुधवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चॅम्पियन्स करंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी तीन आठवडे आधी त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य वाटत असतानाच या स्पर्धेमुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचं समजतंय. स्पर्धेचा यजमान देश पाकिस्तान आयोजनासाठी पुरेसा सक्षम आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, ज्या तीन स्टेडिअमवर स्पर्धेचे सामने भरवले जाणार आहेत, तिथे तयारी अजून पूर्ण नाही. कराची आणि रावळपिंडी इथं तर प्लास्टरिंगचं कामही अपूर्ण असल्याचं दिसतंय. (Champions Trophy 2025)
आणि या मुद्यावरूनच आयसीसी ॲलरडाईस यांच्यावर नाराज होती. त्यांच्या विरोधात दोन मुद्दे होते. गेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात आयसीसीचे पैसे जपून वापरले गेले नाहीत. आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची तयारी नीट सुरू आहे ना, हे पाहणं त्यांचं काम असताना स्टेडिअमचं बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याची माहिती त्यांनी आयसीसी पदाधिकाऱ्यांना वेळेत दिली नाही, असे दोन आरोप त्यांच्यावर होते. (Champions Trophy 2025)
टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीचे महाव्यवस्थापक ख्रिस टेटली यांनीही राजीनामा दिला होता. आता वेळ ॲलरडाईस यांच्यावर आली आहे. खासकरून चॅम्पियन्स करंडकावरून त्यांच्याविरोधात नाराजी आहे. ‘चॅम्पियन्स करंडकाची सज्जता पाहणं हे ॲलरडाईस यांचंच काम होतं. पाकिस्तानमध्ये स्टेडिअमचं नुतनीकरण सुरू आहे, हे आयसीसीला ठाऊक होतं. पण, काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही, इतकी वाईट परिस्थिती आयसीसीला ठाऊक नव्हती. यावरून आयसीसीचं संचालक मंडळ नाराज होतं,’ असं आयसीसीमधील सूत्रांनी मीडियाला सांगितलं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- पालिका प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार ; High Court कडून समिती स्थापन, अहवाल सादर करण्याचे निर्देश)
दुसरीकडे, पाकिस्तानने अजूनही स्टेडिअमचं काम वेळेत पूर्ण होईल असा दावा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी काहीच दिवसांपूर्वी रावळपिंडी इथं कामाची पाहणी केली. आणि सुधारित कार्यक्रमानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण होईल, असा निर्वाळा त्यांनी दिला. पण, पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनीही मंडळावर टीका केली आहे. डॉन या महत्त्वाच्या वृत्तपत्रानेही, ‘आताची तयारी पाहता वेळेत काम पूर्ण झालं तर पीसीबी जगासाठी हीरो ठरेल. आणि नाही झालं तर ते झिरो आहेतच,’ या भाषेत पीसीबीवर टीका केली आहे. आयसीसीचं पथक २ फेब्रुवारीला तीनही स्टेडिअमची पाहणी करणार आहे. (Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स करंडकाचे सामने १८ फेब्रुवारी पासून पाकिस्तान आणि दुबईत होणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत, तर इतर सामने पाकिस्तानमध्ये कराची, रावळपिंडी आणि लाहोर इथं होणार आहेत. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community