MMRDA साठी एकच परिवहन सेवा करण्याचा अभ्यास सुरु; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देणार अहवाल

409

सध्या मुंबईची बेस्ट (BEST), नवी मुंबईची एनएमएमटी (NMMT), ठाण्याची टीएमटी (TMT), कल्याण-डोंबिवलीची केडीएमटीसह (KDMT) वसई-विरार पालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा आहे. मात्र या सर्व प्राधिकरण सेवांचे एकत्रिकरण करून एकीकृत प्राधिकरण स्थापन करण्याचे नगरविकास विभागाने ठरविले आहे. थोडक्यात मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMRDA) एकच परिवहन प्राधिकरण सेवा असावी, यादृष्टीने पावले उचलण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही)

सध्या वसई-विरार पालिकेची (Vasai Virar City Municipal Corporation) परिवहन सेवा बेताचीच आहे. उल्हासनगरची (Ulhasnagar) परिवहन कागदावरच आहे. पनवेलने (Panvel) आता बससेवेसाठी सल्लागार नेमला आहे. भिवंडीत गोदामपट्टा आणि अपर ठाणेतील गृहप्रकल्प वाढत आहेत. एमएमआरडीए भागात तिसरी मुंबई वसणार आहे. यामुळे भविष्यात रेल्वे-मेट्रो स्थानकापासून शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी बससेवा फायदेशीर ठरणार आहे. यामुळेच महामुंबईसाठी एकीकृत परिवहन सेवेचा विचार पुढे आला आहे.

राज्य सरकारने यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत बेस्टच्या महाव्यवस्थापक अश्विनी जोशी, नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचा समावेश आहे. या समितीला २ महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, पनवेल परिसरात नागरीकरण होत आहे. वसई-विरार, पालघर या शहरांतही औद्योगिकीकरण वाढले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, उरण-द्रोणागिरी पट्ट्यातील नियोजित तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकरणही वेग पकडणार आहे. यामुळे महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थांचे नियंत्रण, व्यवस्थापन एकाच व्यवस्थेमार्फत करता येईल का, याचा अभ्यास करून या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.