- प्रतिनिधी
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या “प्रतिष्ठित सेवा” या प्रवासी बससेवेचे मोठे कौतुक होत असून, प्रवाशांमध्ये ती अत्यंत लोकप्रिय आहे. उत्कृष्ट आदरातिथ्य व्यवस्थापनाचा नमुना असलेल्या या सेवेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे प्रयोग करता येऊ शकतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी काढले. ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरूमधील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. रविवारी (२ फेब्रुवारी) त्यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी, कर्नाटक परिवहन सचिव डॉ. एन. व्ही. प्रसाद, महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब, तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैद आणि महाव्यवस्थापक (यंत्र) नंदकुमार कोलारकर उपस्थित होते.
(हेही वाचा – Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अँड साउंड शो पाहून झाले प्रभावित)
कर्नाटक परिवहन सेवांचा अभ्यास
या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या प्रीमियम बसेस पाहिल्या. तसेच, या बसेसची कार्यप्रणाली, सेवा-व्यवस्थापन, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. मंत्री सरनाईक यांनी “खाजगी बसेसच्या तुलनेत अधिक सुरक्षित, वेळेवर आणि प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवणाऱ्या या बस सेवेचे कौतुक केले.”
कर्नाटक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना ९ मीटरपासून १५ मीटरपर्यंतच्या विविध प्रकारच्या बसेस दाखवल्या. डोंगरी भागांमध्ये धावणाऱ्या तसेच महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या बसेसची विविध इंजिन क्षमता, आसन संख्या आणि प्रवाशांच्या गरजेनुसार उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीही दिली.
विशेषतः लांब पल्ल्याच्या बस सेवांमध्ये प्रवाशांसाठी वाय-फाय, युरिनल सुविधा, ई-तिकीट आणि ऑनलाईन बुकिंग यांसारख्या सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातात, याचे सविस्तर सादरीकरण कर्नाटक परिवहन अधिकाऱ्यांनी केले.
प्रशासकीय रचना आणि व्यवस्थापन
कर्नाटक परिवहन सेवेच्या व्यवस्थापनाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण राज्य परिवहन चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागले असून, प्रत्येक विभागासाठी आयएएस दर्जाचे अधिकारी नेमले आहेत. राज्यस्तरीय नियंत्रण आणि समन्वयासाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे परिवहन व्यवस्थापन अधिक सुसूत्र बनले आहे आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवणे शक्य होत आहे.
(हेही वाचा – IND vs SA U19 Women’s T20 WC : भारताच्या पोरी ‘लय भारी’! भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता)
मंत्री सरनाईक यांचे मत
मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना इतर राज्यांतील चांगल्या योजना अभ्यासून आपल्या राज्यात लागू करण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार, कर्नाटक परिवहन महामंडळाच्या ऐरावत, अंबारी, राजहंस यांसारख्या लांब पल्ल्याच्या सेवा आणि त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला.”
कर्मचाऱ्यांसाठी राबवलेल्या प्रोत्साहन योजनांचा तसेच प्रवाशांसाठी लागू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा अभ्यासही यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्रात अशा सेवा सुरू होणार?
या दौऱ्याच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील परिवहन व्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्र एसटी महामंडळात कर्नाटकातील नाविन्यपूर्ण कल्पना आणि चांगल्या योजनांची अंमलबजावणी करता येईल का? याचा आढावा घेण्यात आला. भविष्यात महाराष्ट्र परिवहन सेवेत अशा प्रकारच्या प्रीमियम बस सेवा, ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सूचित केले. ही भेट महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेच्या सुधारणेसाठी महत्त्वाची ठरणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community