मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ज्यांनी राज्याचे नेतृत्व स्वीकारले…उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला…या दीड वर्षात सर्वसामान्यांचा साधेपणाने वागणारा मुख्यमंत्री अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मात्र तरी देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे, पण त्यांच्या मागे लागलेले नैसर्गिक आपत्तीचे ग्रहण काही थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री होताच काही महिन्यात संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आले आणि त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ, कोरोनाची दुसरी लाट आणि आता आलेला महापूर यामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारच्या मागे नैसर्गिक आपत्तीचे ग्रहण लागले आहे.
खराब हवामानाचा फटका दौऱ्यालाही बसला
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या कोल्हापूरमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर जाणार होते. मात्र कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर भागात तुफान पाऊस कोसळला. परिणामी सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. लोकवस्तीत पुराचे पाणी घुसले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची पाहणी केली. सोमवारी सातारा जिल्ह्याची पाहणी करून आढावा घेण्यासाठी गेले. मात्र खराब हवामानामुळे माघारी परतावे लागले होते. गुरुवारी कोल्हापूर दौरा करणार होते. हवामान खात्याकडून दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोल्हापूरला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यापुढे एक नवे संकट उभे राहिले असून मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा ही रद्द करण्यात आला आहे.
(हेही वाचा : राज्यातील निर्बंध शिथिल होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक)
मागील वर्षांपासून संकटाची मालिका सुरूच
गेल्यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात शिरकाव केलेला कोरोना जायचे काही नाव घेत नाही. आतापर्यंत ६२ लाख ५० हजारांहून अधिक लोक बाधित झाली. तर, सुमारे १ लाख ३० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच कोरोना संकटात गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले. ३ जून २०२०ला हे चक्रीवादळ अलिबागजवळ धडकले होते. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला. त्यातच यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला. १७ मे २०२१ रोजी तौक्ते चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर आदळले. पण महाराष्ट्राचा विचार करता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीला मुख्यमंत्री तोंड देत असतानाच आता झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातल्या तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर कोकणातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community