Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार

Ranji Knockout : नुकताच सूर्यकुमार इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका खेळला आहे.

39
Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत खेळलेले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुंबईसाठी रणजीच्या बाद फेरीत खेळणार आहेत. हरियाणाविरुद्धच्या उपउपांत्य फेरीतील सामन्यासाठी मुंबईचा संघ बुधवारी जाहीर झाला. यात या दोघांचीही नावं आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारताने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली आहे. दुखापत आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात व्यस्त असलेला सुर्यकुमार या हंगामातील आपला फक्त दुसरा रणजी सामना खेळणार आहे. यापूर्वी महाराष्ट्राविरुद्धचा साखळी सामना तो खेळला होता. तर त्यापूर्वी तो थेट २०२३ च्या दुलिप करंडकाचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीने त्याला सतावलं होतं. जवळ जवळ १ वर्षं तो क्रिकेटपासून दूर होता. (Ranji Knockout)

तर शिवम दुबेही या हंगामात सातत्याने रणजी सामने खेळलेला नाही. त्यालाही पाठदुखीनं सतावलं होतं. अलीकडेच जम्मू व काश्मीर विरुद्धचा सामना दुबे खेळला. पण, यात तो दोन्ही डावांत शून्यावरच बाद झाला. इंग्लंडविरुद्ध मात्र दुबेनं चांगली कामगिरी केली असून संधी मिळालेल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ५४ (३४ चेंडू) आणि ३० (१३ चेंडू) धावा केल्या होत्या. दुसरीकडे सूर्यकुमार यादव मात्र या मालिकेत फ्लॉप ठरला. त्याने दोन भोपळ्यांसह एकूण २८ धावा केल्या. (Ranji Knockout)

(हेही वाचा – Shivjayanti 2025 : किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल)

रणजीबद्दल बोलायचं झालं तर गतविजेत्या मुंबईने यंदा जेमतेम बाद फेरीत प्रवेश केला आहे. जम्मू व काश्मीर संघाविरुद्धच्या पराभवामुळे आव्हान खडतर झालेलं असताना मेघालयाविरुद्ध एक डाव आणि ४३५ धावांनी विजय मिळवत मुंबईने बोनस गुण जिंकला. त्याच्या जोरावर बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता बाद फेरीचा सामना ८ फेब्रुवारीपासून लाहिली इथं होणार आहे. (Ranji Knockout)

मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, सुर्यांश शेडगे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहीत अवस्थी, सिल्वेस्टर डिसुझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर व हर्ष टन्ना. (Ranji Knockout)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.